कोरेगाव / प्रतिनिधी :
सातारारोड येथील वसंत सहकारी औद्योगिक वसाहतीतील गणेश फरसाणा कंपनीला मंगळवारी पहाटे आग लागली. बघता-बघता आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरात गोंधळ उडाला. सातारा, रहिमतपूर यासह अनेक नगरपालिकांचे अग्निशामक दलाचे बंब, कूपर कंपनीची अग्निशमन यंत्रणा, ग्रामस्थ आणि पोलिसांनी अविरत परिश्रम घेतल्यानंतर तब्बल चार तासांनी आग आटोक्यात आली. आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सातारारोडमधील नंदकुमार कुलकर्णी आणि विनायक परशुराम गजरे यांनी श्री गणेश फरसाणा कंपनीची स्थापना केली आहे. तर वैभव नंदकुमार कुलकर्णी व संकेत विनायक गजरे यांनी शाही नमकीन कंपनी सुरु केली आहे. या दोन्ही कंपन्या एकाच ठिकाणी सुरु होत्या. मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास या कंपनीला आग लागली. फरसाणा निर्मितीसाठीचे तेल, खाद्यपदार्थ आदी ज्वलनशील साहित्य व मशिनरी असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचे मोठे लोट आणि धुरामुळे सातारारोडमध्ये एकच खळबळ उडाली. जयाला माहिती समजेल, त्याने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ आणि युवकांनी अग्निशामक दलाचे बंब येईपर्यंत मिळेल त्या वस्तुने पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
मंडल अधिकारी जाधव, तलाठी प्रशांत पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.