एक युवक पॉझिटिव्ह, १५ निकटवर्तीय व ३ डॉक्टर हायरिस्क संपर्कात
प्रतिनिधी/नागठाणे
बोरगाव (ता.सातारा) येथील एका युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ बाधित सापडलेल्या परिसरपासून २५० मीटरचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला असून त्यामध्ये बोरगाव पोलीस ठाणे समाविष्ट आहे. प्रशासनाने बाधिताच्या संपर्कात आलेल्या एकूण १५ जणांना क्वारंटाइन केले असून परिसरातील ३ डॉक्टरही हायरिस्कमध्ये आले आहेत.
बोरगाव पोलीस ठाण्याच्या मागील बाजूसच बाधित ३१ वर्षीय युवक आपल्या नातेवाईकांकडे राहावयास होता. तो येथीलच एका खासगी संस्थेत पिकअप वर चालक म्हणून कामाला होता. संस्थेचे फूड प्रॉडक्ट्स घेऊन तो महाबळेश्वर,महाड( कोकण) येथे डिलीव्हरी साठी जात होता.१७ जून रोजी कणकणी व खोकला असल्याने प्रथम शेंद्रे गावातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. त्यानंतर तो गावातीलच घराजवळील खासगी दवाखान्यातही उपचारासाठी गेला. मात्र प्रकृती न सुधारल्याने २३ जूनला नागठाणे-सासपडे रस्त्याजवळील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता. तेथे तीन दिवस उपचार करूनही काहीच फरक न पडल्याने त्याला शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे त्याच्या स्वॅब काढून तपासणीसाठी पाठविण्यात आला. शनिवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बोरगावच्या युवक कोरोना पोजेटीव्ह असल्याची माहिती गावात कळताच एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाने तात्काळ या परिसरातील लोकांची तपासणी मोहीम हाती घेतली.बाधिताच्या घरातील व शेजारी अतिनिकट सहवासातील ११ व खाजगी संस्थेतील ४ अश्या १५ जणांना तात्काळ क्वारंटाइन करून त्यांना पानमळेवाडी येथे कोरंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. तर बाधिताच्या संपर्कात आलेल्या शेंद्रे,बोरगाव व नागठाणे येथील डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियांचे स्वेब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.जी.कांबळे,डॉ.पराग जोशी,डॉ.स्वनिल धर्माधिकारी,मंडलाधिकारी नितीन घोरपडे,तलाठी अशोक साबळे,कोतवाल महेश तांबोळी,सरपंच सुनीता बनकर,उपसरपंच नितीन घाडगे व ग्रामसेवक निकम यांनी भेट देऊन पाहणी केली.
बोरगावमध्ये तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन
सतर्क झालेल्या ग्रामपंचायतीने तात्काळ ग्रामसमितीची बैठक घेतली. यावेळी संपूर्ण गावात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान लॉक डाऊनच्या नियम मोडणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे उपसरपंच नितीन घाडगे यांनी सांगितले.