माधुरी जाधव यांना पदोन्नती
प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या भरोसा सेलच्या प्रमुख म्हणून काम पहात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक माधुरी जाधव यांची दि.3 रोजी ठाणे शहर येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस उपनिरीक्षक फाळके यांची नियुक्ती झाली आहे.
माधुरी जाधव ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्या आहेत. राज्य सेवेच्या पहिल्याच प्रयत्नात त्या पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या. त्या सासुर्वे गावच्या असून 2009 साली त्यांची पहिली पोस्टींग औरंगाबाद ग्रामीण येथे होती. तेथून मुंबई येथे सायबर विभागात, सीआयडीमध्ये कार्यरत होत्या. तेथून जून 2017 मध्ये त्यांची साताऱ्यात बदली झाली.
सुरुवातीला एलसीबीमध्ये होत्या. त्यानंतर त्यांच्याकडे निर्भयाच्या नोडल ऑफिसर म्हणून पदभार सोपवण्यात आला होता. ते काम त्यांनी अगदी 3 मार्च 2021 पर्यंत जिल्हा सहाय्यक समन्वय अधिकारी म्हणून केले. निर्भया पथकाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी नाईट वॉकीथॉन, रोड रॅली, स्वरक्षणाचे धडे देण्यामध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच पंधरा दिवसाचे पोलीस मुख्यालयातील महिला अधिकारी, अंमलदारांसाठी स्वरक्षणाचे धडेही दिलेले होते. निर्भयाचे भरोसा सेलचे इनचार्ज म्हणूनही त्या काम पहात होत्या.
भरोसा सेलमध्ये महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या शंकाचे त्यांनी निरसन केले. त्याच बरोबर महिलांच्या तक्रारी अर्जाचे समुपदेशन करुन 90 टक्के संसार जोडण्याचे महत्वपूर्ण काम केले. लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या केसेसचा प्रामुख्याने त्यांनी निपटारा केला. 2018 पासून विशेष महिला तपास पथकाच्या इनचार्ज म्हणून काम पाहिले. क्लिस्ट गुह्यांचा गांभीरपणे तपास करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. स्टुडंड पोलीस कॅडेट कोर्स सहाय्यक समन्वयक अधिकारी म्हणून काम केले. 2019 मध्ये नवी दिल्ली येथे मास्टर ट्रेनर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.