पालिकेने काढले दोन ट्रॅकटर मृत मासे
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सूचना देताच कामाला वेग
कायम स्वरूपी उपाय योजना करण्याच्या हालचाली सुरू
प्रतिनिधी / सातारा
गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक वातावरणात बदल झाल्याने ऐतिहासिक अशा मंगळवार तळ्यात मृत मासे झाल्याची घटना घडली. पालिकेच्या आरोग्य विभागास उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सूचना देताच तळ्यातले दोन ट्रॅक्टर मृत मासे दोन दिवसात बाहेर काढले. अजून दोन दिवस मासे बाहेर काढण्यास लागतील असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कायमस्वरूपी मासे जिवंत राहतील यासाठी बंदोबस्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
थंडी गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक वाढली अन सातारा येथील मंगळवार तळ्यात मासे मृत होऊन तळ्यावर तरंगू लागले अन दुर्गंधी निर्माण झाली. त्याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे ही बाब निदर्शनास आणून देताच उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी याबाबत सूचना आरोग्य विभागास दिल्या. आरोग्य विभागाने गेल्या दोन दिवसापासून स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दोन दिवसात काम पूर्ण होईल
तळ्यातले मृत मासे बाहेर काढून सोनगाव कचरा डेपोत टाकून देण्याचे काम पालिकेच्यावतीने सुरू आहे.7पोती पावडर टाकण्यात आली आहे. दोन दिवसात काम पूर्ण होईल.
उपनगराध्यक्ष, मनोज शेंडे
थंडीमुळे मासे मेले
या तळ्याच्या परिसरात आम्ही राहतो. तळ्यात असलेल्या मास्यांना वाढलेल्या थंडीमुळे ऑक्सिजन मिळाला नाही. यापूर्वी दोन वेळा तळे स्वच्छ केले आहे. कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा.
धनंजय शिंदे, नागरिक
तळ्याची स्वच्छता करावी
सातारा शहरातील इतिहास कालीन अशा मंगळवार तळ्याची ही अवस्था आहे. आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. तळ्याची स्वच्छता करावी, जेणेकरून हे तळे स्वच्छ दिसले पाहिजे .
राहुल जाधव, नागरिक