गोडोली / प्रतिनिधी :
देशपातळीवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावचा लौकिक वाढविणाऱ्या शिवथरमध्ये दारू आणि मटका धंदे जोमात सुरू आहेत. मंथली देतो, त्यामुळे कारवाई होत नाही असा धंदेवाल्यांचा आवाज तर हातात दांडकी घेऊन धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा तरुणांनी निर्धार केल्याने मोठी घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी दारू आणि मटका धंदे बंद करावेत, अशी अपेक्षा शिवथर ग्रामस्थांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.
शिवथर (ता. सातारा) परिसरामध्ये अवैधरित्या देशी दारू, मटका धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असून दारू मटक्याच्या नादाने तरुण पिढी बरबाद होऊ लागली आहे. याबाबत स्थानिक प्रतिनिधीनी पोलिसांना माहिती देऊनही कारवाई होत नसल्याने त्यांच्यातील आर्थिक नात्याबद्दल संशय व्यक्त होऊ लागला आहे. आदर्श गाव म्हणून देशपातळीवर लौकिक असलेल्या शिवथरमध्ये आता दारू, मटक्यामुळे काही कुटूंबाची वाताहत होत असल्याचे दिसू लागले आहे.
सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये वारंवार तक्रारी करून ही शिवथरमधील बेकायदेशीर सुरू असलेल्या दारु आणि मटका धंद्यावर कारवाई होत नाही. आतापर्यंत अनेक अधिकारी आले ,गेले पण प्रत्येकाशी या धंदेवाल्याची आर्थिक सोयरीक जुळत असल्याने कधीच कडक कारवाई झाली नाही, असे शिवथर ग्रामस्थ उघड बोलतात.
काही वेळा दारू, मटका सुरू असल्याची सातारा तालुका पोलिसांना सामाजिक कार्यकर्त्यांनी चोरून खबर दिली. तेव्हा पोलिसांकडून गावच्या पोलीस पाटलांना दारू आणि मटक्याची प्रत्यक्ष जाऊन माहिती द्यावी, असे आदेश दिले जातात. मात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कारवाईसाठी गावात फिरकत नाहीत. तर दारु आणि मटका धंदेवाले ग्रामस्थांना ‘मंथली देतो, कारवाई होणार नाही,’ असे आवाज वाढवून सांगतात.
दारू आणि मटक्यामुळे सारा गाव वैतागला आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही तर कायदा हातात घेऊन आम्ही धंदे कायमचे बंद करणार, असा तरुणांनी निर्धार केला आहे. अनुचित प्रकार घडण्याआधी पोलिसांनी कारवाई करावी,अशी मागणी शिवथर ग्रामस्थांनी केली आहे.