कराड / प्रतिनिधी
मस्करवाडी (ता. कराड) येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्या मादी ही पिल्लां सोबत होती. त्यामुळे तिने अचानक हल्ला केला. जखमी शेतकर्याला उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय कराड येथे येथे दाखल करण्यात आले आहे.
ही घटना आज ( दि. १७ ) सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. वनरक्षक ए.एम.जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी (वय ५५, रा. मस्करवाडी, तालुका कराड) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सूर्यवंशी हे सकाळी नऊ वाजण्याच्या माऊली कडी नावाच्या शिवारात जनावरांसाठी वैरण आणण्यास गेले होते. कडब्याच्या गंजीच्या आडोशाला बिबट्या होता. त्याने अचानक सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने सूर्यवंशी यांच्या हातावर, मानेवर, तोंडावर व पोटावर पंजा मारून जखमी केले आहे. सूर्यवंशी यांनी बिबट्याशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व जोरात ओरडले म्हणून बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली.
यानंतर त्यांना उपचारासाठी कराड येथे पाठविले.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे चोरे येथील वनरक्षक ए.एम.जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली. सरपंच म्हास्करवाडी जोतीराम सूर्यवंशी,वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे,वनपाल , वनरक्षक रमेश जाधवर हे सर्व उप जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते.