उंब्रज / प्रतिनिधी :
आशियाई महामार्ग वहागाव ता.कराड गावच्या हद्दीत आयडीएफसी बँकेच्या मँनेजरला रस्त्यात चाकुचा धाक दाखवून ५५ हजारांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दोन अज्ञात चोरट्यांनी पाठीमागे येवून गाडीला डँश लागल्याचे कारण पुढे करुन चाकुचा धाक दाखवला. गळ्यातील चैन, अंगठी व पाकिटातील तीन हजारांची रोकड घेवून पोबारा केला आहे.
याप्रकरणी प्रदिप बबनराव पाटील (वय ३७) व्यवसाय मॅनेजर आयडीएफसी शाखा शनिवार पेठ सातारा, मुळ राहणार तांबवे, ता. वाळवा जि. सांगली सध्या रा. देवी चौक शनिवारपेठ सातारा यांनी तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि. १९ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास प्रदिप पाटील हे सातारा ते तांबवे असा महामार्गाने प्रवास करीत असताना वहागांव येथे आल्यानंतर
दोन अनोळखी चोरट्यांनी पाठीमागुन येवून तुझ्या गाडीने डॅश दिला आहे असे म्हणुन पाटील यांना गाडी आडवी मारली, गाडी थांबवुन गाडीवरुन खाली ओढुन ढकलत सेवा रस्त्यावर नेवून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमंतीची चैन हिसकावुन घेतली व हातातील १७ हजार रुपये किमंतीची अंगठी देत नसल्याने चाकु सारख्या धारधार हत्यार दाखवुन ठार मारण्याची धमकी देवून हातातील सोन्याची अंगठी, खिश्यातील पाकीट व त्यामधील रोख रक्कम ३००० रुपये व इतर सुट्टे पैसे, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गाडीचे कागदपत्र, आयडीएफसीचे एटीएम, एसबीआयचे एटीएम, व युनियन बँक एटीएम
व कागदपत्र हिसकावुन घेवून मारहाण करुन पोबारा केला.
फिर्यादीवरुन दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील करीत आहेत.