२४ तासांतच लावला छडा
प्रतिनिधी / नागठाणे
माजगाव (ता.सातारा) येथे मायक्रोफायनांसच्या वसुली प्रतिनिधीला लुटणार्या तिघा चोरट्यांना केवळ चोवीस तासातच जेरबंद करण्यात बोरगाव पोलिसांना यश आले. मंगळवारी दुपारी या चोरट्यांनी सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल मारहाण करून चोरून नेला होता.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मंगळवारी दुपारी गणेश वैजनाथ राख(वय.२२,रा.उंब्रज ,ता.कराड) या मायक्रोफायनांसच्या वसुली प्रतिनिधीला माजगाव गावच्या हद्दीत तिघा अज्ञात चोरट्यानी मारहाण करून त्याच्याजवळची बैग घेऊन दुचाकीवरून पोबारा केला होता.यावेळी चोरट्यानी रोख ४६,५३७ रुपये व सुमारे ५ हजार रुपये किंमतीचा टेब असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.याची फिर्याद मंगळवारी रात्री उशिरा बोरगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सपोनि डॉ.सागर वाघ यांनी तातडीने सूत्र हलवीत तपासाला सुरवात केली. यावेळी चोरीच्या घटनेत वापरण्यात आलेल्या दुचाकीची माहिती पोलिसांना बातमीदारांकडून लागली. या माहितीच्या आधारे तपास करून बोरगाव पोलिसांनी तीन संशयितांना गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या राकमेपैकी रोख ४०,८०० रुपये व सॅमसंग कंपनीचा टेब असा सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही ताब्यात घेतली. संशयितांची चौकशी सुरू असल्याने त्यांची नावे पोलिसांनी दिली नाहीत.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ.सागर वाघ,पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार नितीन (बाबा) महाडिक,किरण निकम,विजय साळुंखे,विशाल जाधव,प्रकाश वाघ,राहुल भोये,अमित पवार,उत्तम गायकवाड व चालक कपिल टिकोळे व सातारा सायबर सेल यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.