सातारा / प्रतिनिधी :
सर्वसामान्य लोकांत दिवसागणिक अधिकाधिक लोकप्रिय होत असलेल्या ‘मॅरेथॉन’ या आरोग्यदायी चळवळीच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या व या विषयावरील मराठी भाषेतील या पहिल्याच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सातारा येथे पार पडला.
सातारचे आमदार, स्वतः क्रीडाप्रेमी, सायकलपटू व मॅरेथॉनपटू असलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, पत्रकार तुषार तपासे, ओंकार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशाल ढाणे यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे स्वरूप व निमंत्रितांची संख्या मर्यादित स्वरूपाचे ठेवण्यात आले होते. अतिशय उत्साही व प्रसन्न अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या अनुषंगाने सुरू झालेल्या या मॅरेथॉन चळवळीला व त्याची कहाणी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवायला हातभार लावणाऱ्या या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.
दीपस्तंभ प्रकाशनद्वारे प्रकाशित या पुस्तकाच्या विक्रीतून येणारा सर्व निधी दीपस्तंभ फौंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पाला प्रदान करण्यात आला आहे. ‘मनोबल’तर्फे दिव्यांग, अनाथ व वंचित विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्चशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते.