दै. तरूण भारत बातमीचा इम्फॅक्ट
वार्ताहर / कास
सातारा यवतेश्वर कास या मार्गावर पडलेल्या खडयांमुळे वाहनधारकांसह प्रवासी हैराण झाले होते. याची दखल घेऊन दैनिक तरूण भारतने शनिवारी ऑनलाईन व सोमवारी दैनिकात सातारा यवतेश्ववर कास रोड वर खड्डेच खड्डे या मथळ्याखाली सविस्तर बातमी प्रसिद्ध करताच मंगळवारी बांधकाम विभाग व संबधीत देसाई कॉन्ट्रॅक्टरने सातारा बोगदा येथून कास रोडवरील खड्डे भरण्यास प्रारंभ केल्याने वाहनधारक व प्रवाशांनी दैनिक तरूण भारतचे आभार मानुन समाधान व्यक्त केले.
पर्यटनस्थळ कास, बामणोली, तापोळा, जुंगटी, धावली, एकीव परिसरात जाण्यासाठी सातारा, कास, बामणोली हा एकमेव प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरून मोठया प्रमाणात वाहतुक सुरू असते. मात्र या मार्गाची यवतेश्वर घाटात व अन्य ठिकाणी पुरती चाळण होऊन मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांचा खुळखुळा होऊन प्रवाशांचे कबंरडे मोडू लागल्याने प्रवाशी हैराण झाले होते. त्यामुळे वारंवार भागातील सामाजिक कार्यकर्तें व वाहन धारक रस्ता दुरुस्तीची मागणी संबधीतांकडे करत होते. मात्र संबधीत बांधकाम विभाग व ठेकेदार जाणीव पुर्वक वेळ काढुपणा करत टाळाटाळ करत असल्याने नागरीक आंदोलनाच्या तयारीत होते. याचीच दखल घेऊन दैनिक तरूण भारतने शनिवारी ऑनलाईन व सोमवारी दैनिकात सविस्तर बातमी प्रसिद़ध करताच मंगळवारी सातारा यवतेश्वर कास रोडवरील खड्डे भरण्यास सातारा बोगदा येथुन प्रारंभ झाल्याने वाहन धारक प्रवाशांनी समाधान व्यक्त करत तरूण भारतचे प्रतिनिधीशी बोलताना आभार मानले.