सातारा / प्रतिनिधी
वाठार किरोली मधील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील शटर उस्कटून चोरीचा मोठा धोका युवकांच्या सतर्कतेमुळे टळला.
वाठार किरोली ता. कोरेगाव येथे शनिवारी मध्यरात्री सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शटर चोरट्यांनी उसकटले आतील लाईट बंद करून बँकेत प्रवेश करून तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पण शटरला सिक्युरिटी अलार्म सिस्टीम अलर्ट असल्याने तो अलार्म वाजला व त्या सिस्टीम मधून बँकचे शाखाप्रमुख यांना फोन गेला. साहेबांनी लगेच वाठारमध्ये फोन करून युवकांना सांगितले. काही युवक क्षणाचाही विलंब न करता बँकेजवळ लगेच पोहोचले त्यांना बँकेत कोणी तरी आहे याचा अंदाज आला व त्यांनी आरडाओरडा करून चोरांना हुसकावून लावले. त्यांच्या सतर्कतेमुळे व वेळेत पोहोचल्याने ३ चोरांनी तेथून पळ काढला. त्या आधी चोरांनी बँकेचे बाहेरील व आतील शटर कटावणीने उसकुटून बँकेत प्रवेश केला व जिथे तिजोरी आहे त्या दरवाज्याचे लॉक तोडण्याचा प्रयत्न चालू केला होता युवक तिथे वेळेत पोहोचले म्हणून मोठा चोरीचा धोका टळला. रात्री बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच रहिमतपूर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी लगेच शाखेत भेट देऊन शहानिशा केली. सकाळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांनी भेट देऊन पाहणी केली व युवकांच्या प्रसंगावधानामुळे व सतर्कतेमुळे त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. युवकांनी केलेल्या धाडसामुळे आज मोठा अनर्थ टळला असे त्यांनी सांगितले . वाठारची यात्रा दोन दिवसावर येऊन ठेपली असताना हा प्रकार घडल्यामुळे गावामध्ये दक्षता घेणे गरजेचे आहे.