बी.व्होकेशनल नर्सिंग कोर्स पूर्ववत करण्याची मागणी
प्रतिनिधी / सातारा
येथील रयत शिक्षण संस्थेत अनेक निर्णय हे विद्यार्थी हित विरोधात घेतले जातात. विद्यार्थ्यांनी कितीही महत्व पटवून सांगितले तरी संस्थेच्या प्रमुख मंडळीकडून त्यास कोलदांडा दिला जातो. असाच बी. व्होकेशनल नर्सिंग कोर्स पूर्ववत चालू करावा. या मागणीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या समोर अभाविपने निदर्शने केली.
रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महाविद्यालयात नव्याने सुरू झालेल्या बी.व्होकेशनल नर्सिंग कोर्स पूर्ववत चालू करावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातारा यांच्याकडून करण्यात आली. महाविद्यालय प्रशासनाच्या गोंधळामुळे प्रवेश घेतलेल्या साधारण 15 हून अधिक विद्यार्थिनींचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. पंधरा दिवसापूर्वी विद्यार्थिनींनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर ऑनलाईन लेक्चरद्वारे विद्यार्थिनींना शिकवण्यात आले. परंतु, अचानक विद्यार्थिनींना कोर्स बंद केला असल्याचे सांगत त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आणण्याचे काम महाविद्यालय व रयत शिक्षण संस्थेने केले आहे.
महाविद्यालयाने लवकरात लवकर कोर्स सुरु करावे यासाठी आंदोलन केले. यावेळी अभाविप सातारा शहर मंत्री निखिल चव्हाण, शहर सह मंत्री सूरज साबळे, विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते.