प्रतिनिधी / नागठाणे :
महाराष्ट्राचे ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी तंत्र विद्यालय व कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव (ता.सातारा) येथे प्रत्यक्ष भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी हितगुज केले.
यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योग व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, असा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रम समन्वयक तथा प्राचार्य प्रा. मोहन शिर्के यांनी मान्यवरांचे स्वागत करुन बोरगाव येथे राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी प्राजक्त तनपुरे यांनी पेरू सघन लागवड, निशिगंध, हळद, रोपवाटिका, अझोला इ. प्रात्यक्षिकांची पाहणी केली. तसेच रोपवाटिकेतील रोपांचे निगा राखणेसाठी नव्याने उभारलेल्या पॉलिटनेलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव मार्फत शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.