प्रतिनिधी / पुसेसावळी
विटा-महाबळेश्वर या राज्य मार्गाच्या कामात अधिकाऱ्याची डोळेझाक गोर गरीब जनतेच्या मुळावर उठली असून श्रीमंताला सोडा व गरिबाला तोडा अशी अवस्था पुसेसावळी येथे सुरु आहे.
राज्यमार्ग १४० च्या कामात मार्ग प्रकल्प उपविभाग कराडचे उपअभियंता यांनी दुर्लक्ष केलेले आहे. तर ठेकेदाराने कामाची जबाबदारी दिलेल्या कर्मचाऱ्यांना सुवर्णमध्य साधत काम करावे लागत असून दिलेल्या नोटीसप्रमाणे काम न करता नको त्यांची बेकायदेशीर मर्जी राखावी लागत आहे. त्यामुळे पुर्णतः नियमबाह्य तसेच मनमानी काम होत आहे. याबाबतची कल्पना वारंवार उपअभियंता राजेंद्रकुमार रोकडे यांना देऊनही कामाच्या ठिकाणी पाहणी करण्याची तसदी घेतली जात नाही.
विटा ते धामणेर या कामाची गती चांगली आहे या राज्यमार्ग १४० चे कामात प्रकल्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे गोरगरीब जनतेला त्याचा फटका बसत आहे. पुसेसावळी गावात शासकीय नियमानूसार काम न होता गावातील श्रीमंताच्या अतिक्रमनाला धक्का न लावता त्यांना क्लिनचिट देत गोर गरिबावर मात्र अन्याय सुरु केला आहे. पूर्वी करण्यात आलेल्या सर्वेनुसार अतिक्रमित भागावर मार्किंग करण्यात आले होते. या मार्किंग नुसार गोर गरिबांनी आपले अतिक्रमण काढून घेतली. पूर्वी केलेले मार्किंग हे सर्व जनतेने पहिले आहे मात्र, आता त्यानुसार काम होत नसल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नियमानुसार काम करावे अन्यथा रस्त्याचे काम होऊ देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
गावातील अतिक्रमनातील ग्रामपंचायतिची मालमत्ता सर्व्हे नुसार काढण्यात आली मात्र, बड्या धेंडयाची खाजगी मालमत्ता अबाधित ठेवली आहे.