प्रतिनिधी / सातारा
दिवाळीचा पहिला दिवा शिवरायांच्या चरणी.या हेतूने “रायरेश्वर युवा प्रतिष्ठान” गेले अनेक वर्ष रायरेश्वर किल्ल्यावर भव्य दीपोत्सव सोहळा साजरा करत असतो.
याहीवर्षी दीपोत्सव सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमी वर योग्य ती काळजी घेऊन व मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शंभू महादेवाचे मंदिर व परिसराची साफसफाई करून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या.”जय भवानी जय शिवाजी”, “छ. शिवाजी महाराज की….. जय” अशा घोषणा देऊन दीपोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली.
शंभू महादेवाची पिंड फुलांनी सजवण्यात आली. पणत्या लावण्यात आल्या. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, या वेळेस उपस्थित मावळ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते, फुले-गुलाल उधळण व घोषणा तसेच पणत्यांनी परिसर उजळून निघाला. या वेळी रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शिवव्याख्यानकार, समाज प्रबोधनकार, शिवभक्त तसेच शिवकन्या उपस्थित होत्या.