प्रतिनिधी / सातारा
वडुथ (ता.सातारा) येथे मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास युवकाचा दोन जणांनी धारधार शस्त्राने खून केल्याची घटना घडली. मृत युवकाचा मृतदेह घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सचिन पवार असे त्या मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सातारा तालुका पोलीस घटनास्थळी लगेच माहिती मिळताच पोहचले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील वडूथ हे गाव सवेंदनशील म्हणून ओळखले जाते. याच गावात रात्री 9 च्या सुमारास सचिन पवार या युवकाचा खून झाल्याची घटना घडली. गावात सर्व जेवण करून झोपण्याच्या तयारीत असताना हा प्रकार घडला. तो सतत त्रास देत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून दोन जणांनी धार धार शस्त्राने त्याचे पाय तोडून त्याचा निर्घृणपणे खून केला. घरात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडला होता. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा पंचनामा करण्यात आल्याचे समजते. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे हे घटनास्थळी गेले होते. तालुका पोलीस तपास करत आहेत.