पाटण तालुक्यातील जाळगेवाडी येथील घटना, दोघांवर वनगुन्हा
नवारस्ता/प्रतिनिधी
शेताचा बांध जाळताना आग आटोक्यात न आल्याने ती आग वनविभागाच्या हद्दीत गेल्याने वनक्षेत्राच्या हद्दीत वणवा भडकला. परिणामी मोठ्या प्रमाणात वन क्षेत्र जाळल्या प्रकरणी पाटण तालुक्यातील जाळगेवाडी येथील दोघांना वनविभागाने अटक केली. दरम्यान आरोपींना पाटण न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दहा हजाराचा दंड ठोठावल्याची माहिती पाटण वनविभागाचे वनक्षेत्रपाल व्ही. आर. काळे यांनी दिली.
याबाबत माहीती अशी की, काल, बुधवार (दि. ३१) रोजी दुपारच्या सुमारास पाटण तालुक्यातील जाळगेवाडी येथील मारुती ज्ञानू पवार (वय ६९) आणि प्रवीण गणपत पवार (वय ४८) यांनी पवारदरा नावाच्या शिवारात त्यांच्या शेतीचा बांध जाळताना वाऱ्याच्या वेगामुळे आग नियंत्रणात आली नाही. परिणामी वनक्षेत्रात आगीने प्रवेश केल्याने मोठ्या प्रमाणात वणवा पसरला आणि वनक्षेत्र जळून खाक झाले.यासंदर्भात वनविभागाने चौकशी केली असता आरोपींच्या निष्काळजी पणामुळे वनक्षेत्रात वणवा भडकून वनक्षेत्र जळाले.
याप्रकरणी आरोपी मारुती पवार आणि प्रवीण पवार यांच्या विरोधात भारतीय वन विभाग १९२७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपींना पाटण न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपींना १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.