मतदार याद्या व वॉर्ड संरचना बदलावर आक्षेप
प्रतिनिधी / नागठाणे
ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीचा बिगूल वाजला असून एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० रोजी मुदत संपणार्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अनुषंगाने मतदार याद्या अद्यावत करणे, वॉर्ड संरचना लोकसंख्येप्रमाणे बदलणे या बाबी नमुन्यानुसार व तारखेनुसार करण्यात आल्या आहेत.यावर आक्षेप असल्यास ते नोंदवून त्यानुसार बदल करण्याचे काम सध्या सूरू आहे.
सातारा तालुक्यातील वर्णे येथील मतदार याद्या व वॉर्ड संरचना बाबत मुदतीत आक्षेप नोंदवूनसुध्दा केवळ गावातील काही राजकीय मंडळींच्या हितासाठी गांव कामगार तलाठी व मंडलधिकारी (सर्कल)यांनी संगनमताने हेतूपुरस्कर बदल न केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे लेखी स्वरूपात पुराव्यासह दाखल केली आहे. तसेच या तक्रारीचे निरसन होत नाही तोपर्यंत वर्णे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी असे सुध्दा या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत गावातील वॉर्ड क्र. २ मधील मतदारांची नावे वार्ड क्र. ३ मध्ये घातली असून ते मतदार मागील कित्येक वर्षांपासून वॉर्ड क्र.२ मधेच वास्तव्यास असून त्यांनी यापूर्वीच्या सर्व निवडणूकात त्यांनी याच वॉर्डमधून मतदान केले आहे.
यासंबधीचा आक्षेप मुदतीत नोंदवूनसुध्दा गावातील एका गटाचे हित जोपासण्यासाठी गावकामगार तलाठी व सर्कल अधिकारी यांनी संगनमताने त्या आक्षेपाला केराची टोपली दाखविली असल्याचा आरोप जयसिंग तानाजी काळंगे व इतरांनी लेखी तक्रारीव्दारे पुराव्यासह जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदार यांना दिले आहे. यावर तातडीने निर्णय करावा व तोपर्यंत गावातील निवडणूक प्रक्रिया थांबवावी, असे या तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे जयसिंग काळंगे यांनी सांगितले आहे.