नगरला मित्राच्या लग्नाला जाताना काळाचा घाला
उंब्रज / प्रतिनिधी :
आशियाई महामार्गावर वहागाव ता.कराड गावच्या हद्दीत स्विफ्ट कारला झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून अपघातातील मृत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे रहिवासी आहेत. नगर येथील एका मित्राच्या लग्नाला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनास्थळी रक्ताचा सडा, डोके नसलेले धड पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघातात स्विफ्टचा चालक निलेश चिंतामणी मोडकर वय ३० रा.मापन खवने ता वेंगुर्ले जि. सिंधुदुर्ग तसेच मनोज मनोहर परब वय ३५ रा.बाव ता कुडाळ जि. सिंधुदुर्ग, अंकुश देवबा शिंदे वय २५ रा. कुंभारभाट, भरत महाळू बोडेकर वय ३० रा. वैभववाडी (कणकवली) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर रोशन रामा वरग वय २६ रा.निरुखे ता.कुडाळ जी सिंधुदुर्ग असे गंभीर जखमीचे नाव असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचजण मित्राच्या लग्नासाठी स्विफ्ट किर घेवून नगरला निघाले होते. कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या लेनवर आशियाई महामार्गावरून प्रवास करताना स्विफ्ट कार क्र.एम एच ०७ एबी ५६१० ला रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास वहागाव ता.कराड गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील ३ जण जागीच ठार झाले. तर एकास उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर अन्य जण १ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने महामार्गावर वाहणांची तुफान गर्दी होती. कार जीप सारख्या लहान वाहणांची टोलनाक्यावरही दिवसभर वर्दळ होती. दरम्यान दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूर बाजूकडून सातारा बाजूकडे भरधाव वेगाने स्विफ्ट कार निघाली होती. स्विफ्ट कारवरील चालकाचे नियत्रंण सुटल्याने वहागाव येथील हाँटेल जयभवानी जवळ कार रस्ताच्या डिव्हायडरला जोराची धडकली व रस्ता ओंलाडून पुणे-कराड लेनवर उलट्या दिशेला आली या दरम्यान अज्ञात अवजड वाहणावर कार आदळल्याने स्विफ्टचा चक्काचूर झाला. तसेच स्विफ्टचा टप उडून गेला तसेच कारमधील चौघांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. यातील एकाचे धड माने पासून वेगळे झाले होते तर एकाच्या डोक्याची कवटी उडून रस्ताकडेला पडली होती. संपुर्ण कार रक्ताने माखल्याने घटनास्थळीचे मन हेलावून टाकणारे होते. वास्तविक पाचजण मित्राच्या लग्नासाठी परजिल्हात चालले होते. निलेश मोडकर, मनोज परब, अंकुश शिंदे, भरत बोडेकर यांच्यावर काळाने घाला घातला. भीषण अपघातात गंभीररित्या जखमी होवून चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तर रोशन रामा वरग यांच्यावर कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच तो कोतवाल असल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली.
स्पिडोमीटर १६५ ला थांबला
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून अपघातग्रस्त स्विफ्ट कारची पाहणी केली त्यावेळी कारचा स्पिडोमीटर १६५ च्या स्पीडला अडकला असल्याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याच्या सपोनि जयश्री पाटील यांनी दिली. यामुळे घटनेवेळी अपघातग्रस्त कार ही भरधाव वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
अज्ञात वाहनाचे सेफ्टीगार्ड घटनास्थळी
अपघातग्रस्त स्विफ्ट कारच्या समोर पिवळ्या रंगाचे रेडियम असलेले मोठ्या ट्रकला असणारे सेफ्टी गार्ड पडल्याचे दिसत होते. यामुळे कारची धडक ही पुणे कोल्हापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला बसली असण्याची शक्यता घटनास्थळी व्यक्त होत होती. यामुळे तासवडे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज वरून ट्रकचा छडा लागल्यावरच घटना कशी घडली याबाबत उलगडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
घटनास्थळी भयावह स्थिती
दरम्यान अपघातग्रस्त स्विफ्ट कार वेगात होती त्यामुळे कार महामार्गावर डिव्हायडरला धडकून दुसऱ्या लेनवर आली. तसेच कारचा टॉप पूर्णपणे उद्धवस्त होवून चक्काचूर झाला होता तसेच कारमध्ये तिघांचे मृतदेह अडकले होते. हे चित्र वेदनादायी होते. अपघातातील तिन्ही व्यक्तींच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे घटनास्थळी विदारक चित्र होते. चालकाच्या सीटवर असणाऱ्या व्यक्तीचा चेहराही ओळखता येत नव्हता. यावरून अपघाताची भीषणता समोर येत होती.