प्रतिनिधी / वाई
येथील पी. आर. चौकात काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका वानराला विजेचा शॉक लागल्याची घटना घडली. नागरिकांनी, प्राणीमित्र व वनविभागाने मदत केल्याने ते वानर वाचल्याचे नागरिकांनी सांगितले.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाई येथील पीआर चौकात एक वानर डीपीच्या लाईनवरून उडी मारून जात असताना त्याची शेपटी मेन लाईनला लागली व तेथील लाईट ट्रिप होऊन बंद झालीत तसेच वानर खाली पडले. वानराला शॉक लागून पडल्याचे मलटने काका, सुमित दिघे, आनंद बुरसे यांनी पाहिले. त्यांनी लगेच प्राणीमात्रांना कळवले व प्राणीमित्र शाहरुख पटेल, अजीज शेख हे जवळ असल्याने तात्काळ यांनी त्या वानराला पकडून पाणी पाजले. तोच वनखात्याचे वनरक्षक वैभव शिंदे पोहचले. त्यांनी त्या वानरास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील देशपांडे यांकडे नेले त्यांनी उपचार करून त्यास त्याच अधिवासात सोडले.सोडताक्षणी इतर वानर येऊन त्यास घेऊन एकजुटीने घेऊन गेले.