प्रतिनिधी / सातारा
भुईंज पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू वाई तालुक्यातील विरमाडे येथे मंगळवारी मध्यरात्री चोरत्यांनी धुडगूस घालत 11 ठिकणी घरफोड्या केल्या. एकाच रात्री घडलेल्या 11 घरफोड्यामुळे विरमाडे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रमेश कीर्तने, रामचंद्र सोनावणे, अनिता कचरे, विश्वास श्यामराव सोनावणे, प्रणिल संजय सोनावणे, अजय सोनावणे, श्रीकांत गोविंद सोनावणे, बबन कृष्णा सोनावणे, प्रदीप नामदेव पवार, मिलिंद सुरेश पवार, दत्तात्रय नथु सोनावणे या 11 जणांची बंद घरे चोरट्यानी फोडली आहेत. या घरफोड्याप्रकरणी भुईंज पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अधिक माहिती अशी, महामार्गाला लागून असलेल्या विरमाडे येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरत्यांनी गावातील बंद असणारी घरे टार्गेट करून घरफोड्या केल्या. विशेष म्हणजे एक, दोन नव्हे तर तब्बल 11 जणांची बंद घरे या चोरत्यांनी फोडली आहेत. त्यातीलच एक घरात घरफोडीचा प्रयत्न सुरू असताना शेजारील घरातील एक व्यक्तीला जाग आल्याने त्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित चोरत्यांनी त्याला वीट फेकून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन पलायन केले. त्यांनतर गावात या घटनेची माहिती समजताच गावातील काही तरुणांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला, यावेळी काही चोरटे महामार्गाच्या दिशेने निघाल्याचे दिसताच युवकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला यावेळी युवक व चोरट्यांमध्ये झटापटही झाली.
मात्र चोरत्यांकडे धारदार हत्यारे असल्याने चोरटे पसार झाले. सकाळी 11 ठिकाणी घरफोड्या झाल्याचे समजताच विरमाडेसह परिसरात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी या घटनेचे गांभीर्य ओळखुन तात्काळ भुईंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घरफोडयांची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे आपल्या सहकाऱ्यांसमवेत विरमाडे येथे दाखल झाले. त्यांनी तात्काळ श्वान पथकास पाचारण करत चोरी झालेल्या ठिकाणची पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
चांदीच्या मौल्यवान मुखवटे चोरी टाळली
ग्रामदैवत बाळसिद्धनाथ देवाचे पुजारी रमेश कीर्तने यांच्या घरातील कपाटात देवाचे चांदीचे मुखवटे व सोन्याची कर्णफुले होती. मात्र चोरट्यांनी ती कपाटातून काढून खाली टाकली. त्यामुळे देवाच्या अडीच लाखांच्या मुखवट्याची चोरी होता होता वाचली.