पोवई नाक्यावर महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या बाहेर पक्षाचे बूथ लागल्याने कोंडी
शाहू चौक ते कमानी हौद दरम्यान डांबरीकरण सुरू असल्याने वाहतूक वळवली
राजवाडा ते प्रतापगंज जाणारा रस्ता खुदाईमुळे बंद
प्रतिनिधी / सातारा
शहरात मंगळवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत सगळेच रस्ते जॅम होते. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. कराडबाजूने येणारी वाहतूक वायसी कॉलेजच्या दारात, तर पोवई नाक्यावर हॉटेल सायलीजवळ, शाहू चौकात, मोती चौकात राधिका चौकात वाहतूक कोंडी झाली होती.राजवाडा ते प्रतापगंज पेठेकडे जाणारा रस्ता खुदाईमुळे बंद होता.
सातारा शहरात वाहतुकीची कोंडी कधी नव्हे ते आज एवढी झाली होती. सकाळपासून पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने अगोदर वाहतूक कोंडी होत असते. त्यात आज निवडणूकीमुळे अनेक वाहने घराबाहेर पडली होती. त्यामुळे वायसी कॉलेज ते बढिये पेट्रोल पंप या दरम्यान सतत वाहतूक कोंडी होत होती. तर महाराजा सयाजीराव विद्यालयात मतदान केंद्र असल्याने हॉटेल सायली येथे पक्षाचे बूथ लागले होते. तेथे कार्यकर्ते जमले होते. तसाच मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने तेथे वाहतूक कोंडी झाल्याने तेथून वाहनधारकांना वळून जावे लागत होते. तसेच पुढे शाहू चौक ते कमानी हौद या दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक वळवली होती. त्यामुळे अदालतवाडा मार्गावर वाहतूक कोंडी होत होती. तर कमानी हौद ते व्हीनस चौक या दरम्यान केबलचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत होती. गांधी मैदान येथे रस्त्याचे काम सुरू होते तर पशु वैधकीय दवाखाना ते प्रतापगंज पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर खुदाई केल्याने शुक्रवार पेठेतल्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती. राधिका रोडच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने राधिका चौक व बाजार समिती कार्यालयाच्या परिसरात वाहतूक कोंडी होत होती.