महिन्यात जिल्हय़ात कोरोनाने कहर सुरु केला असतानाच सातारा शहर व तालुक्यात धुमाकूळच घातला आहे. एकटय़ा सातारा शहरातील आठ ठिकाणे हॉटस्पॉट ठरलेली असून काळजी घेणे व नियम पाळणे या शिवाय सातारकरांच्या हातात कोणाताही पर्याय नाही. गेल्या महिन्यात शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांसह छोटय़ा विक्रेत्यांच्या जवळपास 6 हजार जणांच्या टेस्ट केल्या असून त्यापैकी 200 जणांचा अहवाल बाधित आला आहे. त्यांच्या हायरिस्क कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगमध्ये हा आकडा पुन्हा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने सातारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. शहरात आजमितीस 711 जण बाधित होम आयसोलेट असून 316 रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
कोरोना संसर्गात पहिल्यांदा कोरोनामुक्त असलेला सातारा शहर व तालुका पाहता पाहता कोरोनाचे हॉटस्पॉट झाला आहे. एकटय़ा सातारा शहरात आजपर्यंत 5 हजार 500 जण पॉझिटिव्ह त्यापैकी 4 हजार 834 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सातारा शहराचा कोरोनामुक्ती रेट 87.89 टक्के एवढा दिलासादायक आहे. शहरात आजमितीपर्यंत 135 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूदर खाली असून तो सध्या 2.5 टक्के एवढा असला तरी मार्चपासून सातत्याने सातारा शहरात होणारी बाधित वाढ थांबलेली नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.
सध्या सातारा शहरात शाहूनगर 29, गोडोली 64, सदरबझार 91, शनिवार पेठेत 33, मंगळवार पेठेत 51, सैनिक स्कूल 21, मतकर कॉलनी 13, शाहूपुरी 38, खेड 21, विकासनगर 19 अशी बाधित संख्या असलेले आठ पेठ व उपनगरे हॉटस्पॉट ठरलेली आहेत. या ठिकाणी होत असलेली बाधित वाढ रोखण्यासाठी तिथे आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु असून तिथे लोकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.
टेस्ट वाढल्याने रुग्णही वाढले
सातारा शहरात गेल्या महिन्यात आरोग्य विभागाकडून टेस्टिंग वाढवण्यात आल्याने शहरात बाधित वाढ झालीय. ज्यांना संसर्ग झाला पण माहितीच नाही असे रुग्ण शहरात हिंडत असल्याने ते इतरांना संसर्ग वाटत होते. त्यामुळे आरोग्य विभागाने दुकानदार, छोटे मोठे विक्रेते, भाजी मंडईतील 6 हजार जणांच्या टेस्ट केल्या. त्यापैकी 200 बाधित समोर आले. त्यानंतर हाय व लो रिस्क कॉन्स्ट्रक्ट ट्रेसिंग गतीने सुरु करण्यात आले लवकरच त्यामुळे बाधित वाढीचा वेग कमी होईल, अशी खात्री आरोग्य विभागाला आहे.
43 मायक्रो कंटेन्मेंट झोन
सध्या सातारा शहरात बाधित वाढ होत असल्याने जवळपास 43 मायक्रो कंटेन्मेट झोन निर्माण झालेत. त्या त्या घरे, दुकानावर स्टिकर्स लावण्यात आलेली असून तिथे परिसरात बाधित रुग्णाच्या नातेवाईकांसह इतरांनी घ्यावयाच्या काळजी बाबत सातारा पालिका आरोग्य विभागाकडून जनजागृतीही करण्यात येत आहे. तसेच पुढील दिवसात तपासण्यांचा वेग वाढवण्यात येणार असून त्यामुळे लवकर निदान व लवकर उपचार यामुळे बाधित वाढीचा वेग आटोक्यात येईल, अशी शक्यता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. जी. पवार यांनी व्यक्त केलीय.
होम आयसोलेट रुग्णांनी नियम पाळा
सध्या शहरात प्रत्यक्ष दवाखान्यात उपचार घेणाऱयांची संख्या 316 आहे तर तीव्र लक्षणे नसलेले किंवा लक्षणेच नाही मात्र बाधित अहवाल आलेले 711 जण होम आयसोलेट आहेत. या सर्व होम आयसोलेट रुग्णांच्या संपर्कात आरोग्य विभाग सातत्याने असून त्यांनी त्यांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण झाल्याशिवाय घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी नियम पाळून सहकार्य केल्यास साथ आटोक्यात येवू शकते.
सातारा शहरात लसीकरण आली गती
बाधित वाढीने सर्वजण चिंतेत असले तरी शहरात सध्या लसीकरणास चांगली गती आली आहे. शहरात 40 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आलेली असून 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे काम सुरु करण्यात आल्यापासून लसीकरणस गती आली आहे. शनिवारी एका दिवसात शहरात 2 हजार 300 जणांनी लस घेतल्याची नोंद झालीय. सातारा शहरात एक लाख 71 लोक संख्या असून त्यापैकी 45 वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रोत्साहित केले जात आहे.