प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरापासून सातारा रेल्वे स्टेशन सुमारे 8 किलोमीटर दूर आहे. देशाच्या कानाकोपऱयात जाण्यासाठी सातारा रेल्वेस्टेशनवरुन रेल्वे गाडय़ांची सुविधा उपलब्ध आहे. सध्या ऑनलाईनचा जमाना असला तरी सुध्दा रेल्वे रिझर्वेशन आणि बुकींगकरीता बहुतांशी सातारकरांना रेल्वे स्टेशनवर जावे लागते. आता मात्र राज्यपाल गणपतराव तपासे (राधिका रोड) मार्गावरील कदम टुर्स ऍन्ड ट्रव्हल्स या एजन्सीकडे रेल्वेचे रिझर्वेशन बुकींगची सेवा पुरवण्याचे काम रेल्वेमंत्रालयाच्या मंजूरीने सोपवण्यात आले आहे. सातारकर नागरिकांनी आता रेल्वे स्टेशनवर जाण्याचा वेळ व खर्च दोन्ही वाचवून, या एजन्सीकडून रेल्वे बुकींगची सेवा प्राप्त करुन घ्यावी असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सातारा शहरात रेल्वेचे रिझर्वेशन/एक्सटेन्शन कौन्टर सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. प्रथमतः सातारा नगरपरिषदेच्या राजवाडा नगरपरिषद इमारतीमध्ये रेल्वे रिझर्वेशन कौन्टर सुरु करण्यासाठी नगरपरिषदेकडुन ठराव पारित करण्यात आला होता. त्याचवेळी खाजगी व्यक्ती संस्थांनी पुढाकार घेतल्यास, त्याचा तरुण उद्योजकांनाही लाभ होईल याचा विचार करुन, कदम टुर्स ऍन्ड ट्रव्हल्स या एजन्सीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजूरीसाठी पाठविला होता.
त्यानुसार कदम टुर्स ऍन्ड ट्रव्हल्सच्या चालकांनी देखिल जागा-इन्फ्रास्ट्रक्चर, इ. बाबींची परिपूर्ण पूर्तता जलद करुन दिल्याने कदम टुर्स ऍन्ड ट्रव्हल्स, राधिकारोड,सातारा यांना रेल्वे रिझर्वेशन बुकींगची मान्यता देण्यात आली आहे.