प्रतिनिधी / सातारा :
सप्टेंबर महिना सातारा जिल्हय़ासाठी मोठा दिलासादायक ठरला आहेच. मात्र, हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा तालुक्यासह शहरात बाधित वाढ आटोक्यात आल्याने सातारकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सध्या सातारा तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 452 एवढी खाली आली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 255, शहरी भागात 197, होम आयसोलेट 93, कोरोना सेंटरमध्ये फक्त 216, प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 124 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एच. पवार यांनी दिली.
आजमितीस सातारा तालुक्यात 3 लाख 74 हजार 595 जणांची तपासणी झाली असून त्यापैकी 3 लाख 29 हजार 938 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर बाधितांची एकूण संख्या 50 हजार 779 एवढी आहे. त्यापैकी 49 हजार 68 जणांनी कोरोनावर मात करत लढाई जिंकलीय. यामुळे साताऱ्याचा रिकव्हरी रेट 96.63 टक्के एवढा चांगला आहे. तर एकूण 1 हजार 467 जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात 752, शहरी भागात 507 तर जिल्हय़ाबाहेरील 208 जणांचा समावेश यात आहे.
सातारा शहरात आजमितीस सक्रीय रुग्णसंख्येचा आलेख खाली घसरला असून तो 197 एवढा आहे. यामध्ये शहरात प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्ण संख्या 40 आहे. तर 46 रुग्ण होमआयसोलेट आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात 101 तर कोरोना केअर सेंटरमध्ये 10 रुग्ण दाखल आहेत.