तीन डिसेंबर रोजी मतमोजणी, मतदारांची उत्सुकता शिगेला
वार्ताहर / औंध
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदान शांततेत पार पडले. निवडणूकिची रणधुमाळी संपली असली तरी मतदारांचे लक्ष गुरुवार 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी कडे लागले आहे. शिक्षक मतदारसंघात मतदारांच्या पसंतीस कोण पास होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिक्षक मतदारसंघात 35 उमेदवार नशीब अजमावत आहेत. विद्यमान शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह महाविकासआघाडीचे प्रा. जयंत आसगावकर आणि शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांच्यात चुरशीचा मुकाबला रंगला होता. रयत आणि स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेतील मतदार संख्या मोठी आहे. मात्र, निवडणुकीत अधिक्रुत उमेदवार नसल्याने या संस्थेतील मतदारांचा कौल कुणाला असणार हे उद्याच्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटणीला असल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांचे निकटवर्तीय प्रा. जयंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विजयासाठी सतेज पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दत्तात्रय सावंत यांनी देखील यांनी देखील संपर्क यंत्रणा गतिमान केली होती. राजकीय नेत्यापेक्षा सामान्य शिक्षकांवर त्यांची अधिक मदार होती. शेवटच्या टप्प्यात सावंत विरुद्ध आसगावकर अशीच निवडणूक रंगली होती. या निवडणुकीत मतदार पसंतीक्रम देतात त्यामुळे तीन तारखेला शिक्षकांच्या पंसतीत कोण पास होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
वाढता टक्का कुणाच्या पथ्यावर
गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. शिक्षक मतदारसंघात चुरशीने 81 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे वाढणारा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याचीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे.