गावठी कड्याचा धाक दाखवून ३७ हजार लुटले, मारहाणीत पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी
प्रतिनिधी / उंब्रज
आशियाई महामार्गावर शिवडे ता. कराड येथील एस. के. पेट्रोल पंपावर सहा अज्ञातानी पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गावठी कठ्ठयाचा धाक दाखवून पंपावरील कर्मचारी व मॅनेजर यांना बेदम मारहाण केली. तसेच पंपावरील ३५ हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल घेऊन पोबारा केला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाची सुत्रे गतिमान केली आहेत.
सोमवारी दि. १४ रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाणीत पंपावरील कर्मचारी सचिन मारूती पवार रा. केळोली ता.पाटण सध्या राहणार उंब्रज यास डोक्यास मार लागल्याने तो जखमी झाला आहे. तसेच पंपाचे मॅनेजर कृष्णात साळुंखे हे झटापटीत किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज नजीक शिवडे ता. कराड गावचे आशियाई महामार्गालगत एस. के. पेट्रोल पंप आहे. सोमवारी दि.१४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून सुमारे सहा जण तोंडाला मास्क, डोक्याला टपऱ्या गुंडाळून पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यांनी दोन दुचाकी च्या पेट्रोल टाक्या फुल करून घेतल्या. त्यांनी सुमारे १८७० रूटयांचे पेट्रोल दोन्ही गाड्यात भरले. त्यानंतर पंपावरील कर्मचाऱ्यास एटीएम कार्ड असल्याचे सांगितले. त्यामुळे मॅनेजर कृष्णत साळुंखे हे पंपाच्या केबिनमधून स्वॅप मशीन घेऊन आले व हातात मशीन घेऊन एटीएम कार्डची मागणी केली. त्यावेळी अचानक त्यातील एटाने हातातील गावठी पिस्तूल सदृश्य हत्यार मॅनेजर साळुंखे यांच्या डोक्यास लावले व कर्मचारी पवार व साळुंखे या दोघांना मारहाण करण्यास सूरुवात केली. मारहाण करत त्यांनी दोघांना ढकलत केबिनमध्ये नेले. त्या ठिकाणी मारहाण करत धक्काबुक्की केली तसेच कर्मचारी सचिन पवार यांना डोक्यात पाण्याचा झार व खुर्ची मारुन जखमी केले. दमबाजी करत पवार याच्या खिशातील १८ हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मॅनेजर यांच्या खिशातून रोकड काढून घेतली.
यावेळी झालेल्या झटापटीत साळुंखे यांनी किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान दरोडेखोरांनी सॅमसंग व व्हिवो कंपनीचे सुमारे बारा हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल काढून घेतले. रोख रक्कम २५ हजार व बारा हजाराचे मोबाईल मिळुन सुमारे ३७ हजाराचा मुद्दे माल घेऊन त्यांनी पोबारा केला. रात्री बारच्या सुमारास पेट्रोल पंपावर शुकशुकाट होता याचा गैरफायदा घेत अज्ञात सहा दरोडेखोर दोन दुचाकीवरून उंब्रज दिशेने पेट्रोल पंपात आले होते. त्या ठिकाणी लुटमार करून त्यांनी कराड दिशेला पोबारा केल्याची संपूर्ण घटना पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कँमेर्यात कैद झाली आहे.
दरम्यान, घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटात उंब्रज पोलिसांची गाडी त्या रस्त्याने प्रवास करीत होती त्यावेळी घडलेली सर्व घटना मॅनेजर व कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि अजय गोरड यांनी एसके पंपावर धाव घेऊन तपास कार्याला सुरुवात केली. तसेच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उप अधिक्षक कराड विभाग, परिक्षाविधीन अधिकारी रेणू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी तीन पथके विविध ठिकाणी रवाना केली असून या घटनेचा लवकरच उलघडा होईल असा विश्वास सपोनि अजय गोरड यांनी व्यक्त केला आहे.