सातारा / प्रतिनिधी :
पेट्रोल, डिझेल आणि गॅस भाववाढीविरोधात सातारा शहर शिवसेनेच्या वतीने पोवई नाका येथे निदर्शने करण्यात आली.
सातारा शहर प्रमुख निमिष शहा यांनी सायकलवरून निदर्शने केली. यात बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख अतिश ननावरे, ऍड शिरीषकुमार दिवाकर, मारुती वाघमारे, सयाजी शिंदे, जितेंद्र वाघंबरे, सुनील भोसले, नंदू केसरकर, महिला संघटिका मीनल शहा, भगवानराव शेवडे आदी शिवसैनिक पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना शहा म्हणाले, गेल्या एक महिन्यापासून केंद्र सरकार छुप्या पद्धतीने दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये १५ पैसे ,२० पैसे अशी वाढ करून लोकांच्या नजरेमध्ये धूळ फेकून सतत दरवाढ करत आहे. मागील महिन्याभरात जवळपास पाच ते सहा रुपये दरवाढ झालेली आहे. ही बाब जनतेच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने भाववाढ करण्यात येते.
कोरोना काळामध्ये नागरिक आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये वडाप वाहतूक, शेतीसाठी लागणारे डिझेल तसेच भाजीपाला इतर ट्रान्सपोर्ट वाहतूक या दरांमध्ये यामुळे वाढ झालेली आहे. परंतु, रिक्षा, टॅक्सी, टेम्पो वाहतूकदार यांना भाडेवाढ शासनाकडून करून मिळत नाही. एस टी महामंडळ डबघाईला आलेले आहे, त्यांनाही डिझेल दरवाढीचा फटका बसलेल्याचे शहा यांनी सांगितले.