संशयित भावास पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रतिनिधी/सातारा
संगमाहुली येथे अंगणवाडी सेविका असलेल्या आपल्या सख्या बहिणीचा भावाने खून केल्याची धक्कादायक घटना घडली. वंदना विजय शिंदे (वय45) असे या मृत महिलेचे नाव आहे. आज, सोमवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. वंदना शिंदे झोपेत असताना भावाने त्यांच्या छातीत चाकूने वार करून खून केला. शिंदे या गावातच अंगणवाडी सेविका होत्या. मुंबईतल्या खोलीच्या वादातून हा खून झाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच संशयित नंदकुमार चंद्रकांत माने ( रा.धारावी मुंबई) यास ताब्यात घेतले. या घटनेमुळे तीर्थक्षेत्र असलेली दक्षिण काशी संगमाहुलीत खळबळ उडाली. मृतदेह शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वंदना शिंदे या संगममाहुलीत अंगणवाडी सेविका होत्या. त्यांचे पती, मुलगा असे त्या रहात होत्या. त्यांचे माहेर मूळचे पाटण तालुक्यातील आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे कुटूंब माहुलीत वास्तव्य होते. अनिता यांचा माहुलीत विवाह झाला. दरम्यान, त्यांचा भाऊ नंदकुमार माने हा मुंबईत बीएसटीत नोकरी करतो. वडिलांनी धारावी येथे खोली घेऊन दिली तेथे तो रहातो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या दिवशी लॉक डाऊन लागले. त्याच दिवशी नंदकुमार हा बहिणीकडे संगमाहुली येथे रहाण्यास आला. सुरुवातीचे काही दिवस गोडीत गेले मग धारावी येथील खोलीच्या कारणावरून दोघा बहीण भावात शाब्दिक वाद घडू लागले. रविवारी सगळे जेवण आटोपून झोपी गेले. खोलीच्या विचार सतत नंदकुमार याच्या डोक्यात घोळत होते. बहीण मला त्रास देते आडकाठी करते असे विचार सतावत होते. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याने बहिणीच्या घरातला धारधार चाकू घेतला अन झोपी गेलेल्या बहिणीच्या छातीत वार केला. झोपेत झालेल्या वंदना यांनी यावेळी एकच किंकाळी फोडली. यामुळे पती विजय आणि लहान मुलगा हे पुरते भयभीत झाले.
विजय यांनी ही माहिती पोलीस पाटील श्रीमती धोत्रे यांना कळवली. त्यांनी ही माहिती संगमनगर पोलीस चौकीत कळवली. ही माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकासह सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी पोहचत त्यांनी संशयित आरोपी नंदकुमार याला ताब्यात घेतले. मृत पावलेल्या वंदना शिंदे यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.या घटनेची फिर्याद विजय शिंदे यांनी दिली असून तपास सहायक पोलिस निरीक्षक वाळवेकर करत आहेत.