शाहूपुरी : आंतरराष्ट्रीय पर्वतदिनाचे औचित्य साधून अजिंक्यतारा किल्ल्यावर पर्वत व निसर्ग पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अक्षोभसिंग व प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संदीप श्रोत्री उपस्थित होते.
अक्षोभसिंग कॉर्बेट फौंडेशन’ ट्रस्टी – सेंट्रल हिमालयन इन्व्हॉयर्नमेंट असोसिएशन’ चे संस्थापक सदस्य, ‘वर्ल्ड वाइड फंड’ (WWF) भारत-कुमाऊ कमिटी चे माजी अध्यक्ष आहेत. यांनी सह्याद्री आणि हिमालय आपल्या भारत देशाच्या जैव-विविधता संवर्धनासाठी किती महत्त्वाचा आहे, याबद्दल माहिती दिली. तर डॉ. श्रोत्री यांनी पर्वत ते नद्या हे जल चक्र पटवून सांगितले.
दरम्यान, गेल्या महिन्यात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सातारा डिस्ट्रिक्ट माउंटेनियरिंग असोसिएशनची घोषणा केली. या सातारा असोसिएशनची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यकारिणी जाहीर झाली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी एव्हरेस्टवीर आशिष माने, उपाध्यक्ष सुनील भाटिया, सचिव शार्दूल टोपे, सहसचिव रणवीर गायकवाड, तर खजिनदार प्रवीण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अनिकेत पवार, कल्याण कदम, माधव प्रभुणे व कैलास बागल यांची समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ ही संस्था महाराष्ट्रातील गिर्यारोहणातील शिखर संस्था आहे. गिर्यारोहण या क्रीडा प्रकाराचा प्रसार प्रचारासाठी ही संस्था कार्यरत आहे. गिर्यारोहण हा खेळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोहचवता यावा याकरिता या शिखर संस्थेची व्याप्ती वाढविण्याचे काम महासंघाने हाती घेतले आहे. या अंतर्गत जिल्हा पातळीवर व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी अधिकृत संलग्न अशी सातारा डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यालाही मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, याच्याच आधारे सातारा जिल्हा व शहर परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाची व इतिहासाची आवड निर्माण करण्याचे काम हे डिस्ट्रिक्ट असोसिएशन करणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांमधे गिर्यारोहण, निसर्ग, इतिहासाची जनजागृती करण्याचे कामही असोसिएशनने हाती घेतले आहे.