उंब्रज / प्रतिनिधी :
चोरे ता.कराड येथील सेवानिवृत्त एसआरपीएफ जवानाच्या पेन्शन खात्याचे एटीएम चोरुन खात्यातील ५ लाख ५२ हजाराची रक्कम वेळोवेळी काढून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोरखनाथ बंडु लोखंडे वय ६५ राहणार चोरे ता.कराड यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत गोरखनाथ लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे सन २०१३ साली एस.आर.पी.एफ. ग्रुप- १ वडोद्रा राज्य – गुजरात येथुन सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासुन ते चोरे ता.कराड येथे पत्नी मालन यांच्या सोबत राहतात. फिर्यादीस गुजरात सरकारची पेन्शन सुरू असून, ती बँक ऑफ इंडिया
बचत खात्यात दरमहा सुमारे १८ हजार रूपयांच्या आसपास जमा होते.
दरम्यान, वय झाल्यामुळे फिर्यादी यांनी घराच्या भिंतीवर ए.टी.एम.कार्डचा पिनकोड लिहिला होता. तसेच ते पेन्शन काढायला जाताना भाची सुरेखा उर्फ ताई अशोक पालवे रा. पाडळोशी ता.पाटण यांचा मुलगा नितीन पालवे यास घेवुन जात होते. मात्र, घरात गरजे पुरते पैसे असल्याने त्यांना लाँकडानच्या काळात पैशांची आवश्यकता भासली नाही. लॉकडाऊनचे निर्बंध उठल्यानंतर दि.१५ नोव्हेंबर रोजी त्यांनी बँक ऑफ इंडियाचे पेन्शचे पासबुक नोंदविण्यासाठी गावातील मेडिकलवाले बळीराम याचेकडे दिले. पुस्तक भरल्यानंतर दि. १ जुलै ते दि. ४ नोव्हेंबरमध्ये या कालावधीत वेळोवेळी सुमारे ५ लाख ५२ हजार २७० रूपयांची रक्कम खात्यावरुन कोणीतरी काढल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घरात ठेवलेले बैंक ऑफ इंडियाचे ए.टी.एम.कार्ड पैशांच्या पाकिटात पाहिले असता ते पाकीटात नव्हते. त्यानंतर ए.टी.एम. कार्डचा घरामध्ये शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. त्यानंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे ए.टी.एम.कार्ड चोरून त्यातुन दि १ जुलै ते दि. ४ नोव्हेंबरमध्ये या कालावधीत वेळोवेळी सुमारे ५ लाख ५२ हजार २७० रूपयांची रक्कम काढली. अज्ञात चोरट्या विरूध्द उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड करीत आहेत.