सातारा : जिल्हा वार्षिक योजनेची सन 2021-22 च्या प्रारुप आराखडा मंजुरीची बैठक सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत 2021-2022 जिल्हा वार्षिक योजनेसाठी 140 कोटींच्या वाढीव मागणीसह 485.90 कोटींच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आज झालेल्या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, यांच्यासह विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
सन 2021-22 साठी राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 140 कोटींच्या वाढीव मागणीसह 404.49 कोटींची, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 79.83 कोटी तर आदिवासी क्षेत्र बाह्य उपयोजनेसाठी 1.58 कोटी इतक्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मान्यता देण्यात आली.