मास्क लावून विद्यार्थी देणार पेपर : एका वर्गात केवळ दहा विद्यार्थी
वार्ताहर / सातार्डा:
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सातार्डा येथील परीक्षा केंद्राला सावंतवाडी शिक्षण विस्तार अधिकारी सौ. दुर्गा साळगावकर यांनी भेट देत आढावा घेतला. परीक्षा केंद्रासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. नियमांचे कडेकोट पालन करून परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन यावेळी सौ. साळगावकर यांनी केले.
लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात प्रत्येकी दोन केंद्र तयार करण्यात आली आहेत. आरोंदा येथील केंद्रावर 22 तर सातार्डा येथील केंद्रावर 44 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली आहे. सावंतवाडी तालुक्यात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र कार्यरत आहे. या केंद्राचा आढावा सोमवारी शिक्षण विस्तार अधिकारी सौ. दुर्गा साळगावकर यांनी घेतला.
सातार्डा प्री प्रायमरी स्कूल सकाळी पूर्णतः निर्जंतुकीकरण करण्यात आले. एका वर्गात दहा विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून चार वर्गात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. प्री प्रायमरी स्कूलचे स्थानिक कमिटी अध्यक्ष उदय पारिपत्ये, प्रवीण मांजरेकर, सातार्डा सरपंच भरत मयेकर यांच्याशी सौ. साळगावकर यांनी चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या. सोशल डिस्टन्स व मास्क वापरणे विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आले. येथील व्यवस्थापन पाहून सौ. साळगावकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते सागर प्रभू, योगेश गोवेकर, वासूदेव वेंगुर्लेकर. अशोक जाधव, सुधाकर वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.