धरणसाठय़ात कमालीची वाढ, वाऱयामुळे अनेक ठिकाणी पडझड
प्रतिनिधी/ सातारा
हवामान खात्याने दिलेल्या रेडअलर्टप्रमाणे सातारा जिल्हय़ात रविवारी सकाळी 11 च्या सुमारास धुवाँधार पाऊस, वाऱयाबरोबरच पावसाचाही वेग मोठा असल्याने सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत होती. तसेच महामार्गावर वाहनांचे लाईट लावूनच चालक वाहन चालवत होते. जिह्यातील पाटण, कराड, वाई, सातारा, जावली आणि महाबळेश्वर या तालुक्यांना चांगलेच झोपडून काढले. कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने धरणाच्या पाणीसाठय़ातही वाढ झाली आहे. दरम्यान, कोरेगाव, खंडाळा, फलटण, माण, खटाव या तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे.
सातारा शहरात रस्त्यांना आले ओढय़ांचे स्वरुप
सातारा शहराचा रविवारी बाजाराचा दिवस असल्याने अनेक सातारकर बाजाराच्या निमित्ताने बाहेर पडले होते. तोच सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने सुरुवात केली. तब्बल दीड ते दोन तास हा पाऊस झाल्याने चांगलेच शहराला झोडपून काढले. शहराच्या सखल भागातील रस्त्यावर पाणी साठले होते. तर रस्त्यांना ओढय़ांचे स्वरुप आले होते. राधिका रोड, गोडोली येथे काही ठिकाणी पाणी साठले होते. पाऊस कमी होताच पाण्याचा निचरा झाला. झालेल्या पावसाने शहरात कोठेही हानी झाली नाही. दरम्यान, जिह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला असून वाऱयांने अनेक ठिकाणी पडझड झाली असून पिकांचे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने सातारा जिह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार कधीही पाऊस येतो आहे. रविवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिलेली होती. साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने सुरुवात केली. पावसाने जोरदारपणे प्रारंभ केला. बघता बघता शहरातील सर्वच रस्त्यांना ओढय़ाचे स्वरुप आले. त्यात पोवई नाक्यावर हॉटेल सायली, महाराजा सयाजीराव विद्यालय ते आमदार शंभूराज देसाई यांच्या बंगल्याच्या समोर पाणी साठले होते. आरटीओ ऑफिसच्या पाठीमागील बाजूस पाणी साठले होते. राधिका रोडला नेहमीप्रमाणे राधिका पॅलेस हॉटेलसमोर पाणी साठले होते. गटर आणि रस्ता एक झालेला होता. राजवाडा परिसरात पावसाने चांगलीच त्रेधा उडवली होती. फुटपाथ विक्रेत्यांची दुकानांची आवराआवर करण्याची लगबग झाली. गोडोलीमध्ये स्वराज्य नगर, पालवी चौकातील रस्त्यांना ओढय़ाचे स्वरुप आले होते. अनेकांनी आपले छत्री, रेनकोट हे घरी ठेवल्याने या पावसात भिजले.
सातारा तालुक्यामध्ये पावसाबरोबरच वाऱयाचा वेग
सातारा तालुक्यामध्येही सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसासोबत वाऱयाचाही वेग होता. त्यामुळे शेतीकामात असलेल्यांनी या पावसाच्या चळकेत अधिक वेगाने काम केले. भात लागणीला हा पाऊस चांगलाच असल्याचे बोलले जात आहे. वाऱयाने सातारा तालुक्यात कोठेही नुकसान झाले नसल्याचे समजते.
धरण क्षेत्रात मुसळधार, धरणसाठय़ात वाढ
धरण परिसरात जोराचा पाऊस झाला आहे. त्यात कोयना येथे 61 मिमी/2445मिमी, नवजा 84 मिमी/3189मिमी, महाबळेश्वर 74मिमी/ 3213 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात पाणीसाठय़ात वाढ होत असून कोयना धरण 67.57 टीएमसी, धोम 7.45 टीएमसी, बलकवडी 3.34 टीएमसी, कण्हेर 6.98 टीएमसी, उरमोडी 7.05 टीएमसी, तारळी 4.95 टीएमसी, येरळवाडी 0.15 टीएमसी, नेर 0.13 टीएमसी, राणंद 0.07 टीएमसी, नागेवाडी 0.14 टीएमसी, मोरणा 0.98 टीएमसी, उत्तरमांड 0.59 टीएमसी, वांग 1.78 टीएमसी एवढा पाणी साठा होता.
महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला
महाबळेश्वर ः शहर व परिसरात पावसाने जोर धरला असून गत चार दिवसांपासून शहर व परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात संपूर्ण जून महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरु होता. मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून शहर व परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. मात्र जुलै महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापासून पावसाने दडी मारल्याने एन जुलै महिन्यात कधी नव्हे ते महाबळेश्वरवासियांना सूर्यदर्शन झाले. आता गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने धुवाँधार बरसण्यास सुरुवात केली आहे. शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटकांची चांगलीच रेलचेल येथे अनुभवयास मिळत आहे. पर्यटकांची गर्दी पर्यटनस्थळी होत असून पर्यटक या वातावरणच अनुभव घेतना दिसत आहेत.