दररोज पाच शो – ’बुक माय शो’ 80 टक्के बुकींग – एका शो वेळी फक्त 236 रसिक
प्रतिनिधी/ सातारा
गेली 20 महिने कोरोना संसर्गाचा कहर, लॉकडाऊन आणि त्यातून आलेल्या अनेक जीवघेण्या संकटाला तोंड देत सावरलेल्या साताऱयात कोरोनाचा कहर आटोक्यात आल्याने चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली. सध्या साताऱयातील एकमेव राजलक्ष्मी चित्रपटगृह 5 रोजीपासून सुरु झाले असून तिथे सुरु असलेल्या ’सूर्यवंशी’ या बिगबजेट स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाचे दैनंदिन पाचही शो हाऊसफुल्ल होत आहेत. चित्रपट रसिक पुन्हा नव्याने मनोरंजनाचा आनंद लुटत आहेत.
जिल्हय़ात सध्या कोरोना स्थिती आटोक्यात आलीय. सक्रीय रुग्ण संख्या कमी झाल्याने बहुतांशी गोष्टी नियम पाळून सुरु करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलीय. यामध्ये चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आल्याने चित्रपटरसिकांच्या आनंदात भर पडली आहे. दि. 5 ऑक्टोबर रोजी साताऱयातील एकमेव असलेले राजलक्ष्मी चित्रपटगृह चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सुसज्ज करण्यात आले आहे. सेव्हनस्टारमधील मल्टीप्लेक्स अद्याप बंदच असून कदाचित ती देखील सुरु होतील मात्र तशा हालचाली तिथे दिसल्या नाहीत.
राजपथावरील राजलक्ष्मी चित्रपटगृह हे गेल्या 48 वर्षांपासून रसिकांच्या सेवेत आहे. इतर राधिका, समर्थ, प्रभात, जयविजय, कृष्णा ही चित्रपटगृहे काळाच्या ओघात बंदही पडली. मात्र, राजलक्ष्मी चित्रपटगृह रसिकांच्या मनोरंजन सेवेसाठी सुरु ठेवण्याचा निर्धार मालक अतुल खुटाळे यांनी जपलेला आहे. त्यामुळेच तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ कालानंतर या चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होताना चित्रपटगृहाचे नूतनीकरण करुन घेण्यात आलेले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथे नियम पाळून सुरु रसिक चित्रपटाचा आनंद लुटत आहेत.
दररोज पाच शो हाऊसफुल्ल
राजलक्ष्मी चित्रपटगृहात सूर्यवंशी चित्रपटाचे दैनंदिन पाच शो सुरु असून बुक माय शो वर त्याचे बुकींग होत आहे. चित्रपटगृहात 470 रसिकांची बसण्याची सोय आहे. मात्र 50 टक्के परवानगी असल्याने फक्त 236 रसिकांना चित्रपट पाहता येतोय. बुकींग देखील फुल्ल होत असल्याने चित्रपट व्यवसायास चांगला आरंभ झाला असून पुढील आठवडय़ात व येत्या काही महिन्यात बंटी और बबली 2, अंतिम, तडफ, दे धक्का 2, गंगुबाई काठेवाडी तसेच केजीएफ 2 हे चित्रपटही झळकणार आहेत.
तरुणाईच्या उत्साहाला उधाण
चित्रपटांचे आकर्षण चित्रपट रसिकांसह तरुणाईला अधिक असते. साताऱयात गेली दीड वर्षे महाविद्यालये बंद असल्याने घरात बसून राहिलेली तरुणाई आता अनलॉक प्रक्रियेनंतर बाहेर पडू लागलीय. त्यातच आता चित्रपटगृह सुरु होवून त्यांच्या आवडीच्या अभिनेत्यांचा चित्रपट मोठय़ा स्क्रीनवर पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने चित्रपटगृहावर तरुणाईच्या उडय़ा पडत आहेत. शासनाच्या नियमानुसार कोरोनाचे नियम पाळत ही तरुणाई चित्रपटाचा आनंद लुटत आहे.