प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषणा देत सातारा शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत जिह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेश परिधान करुन वातावरण शिवमय करुन सोडले होते. या शोभायात्रे विविध संदेश देणारे चित्ररथ होते. ही शोभायात्रा पहाण्यासाठी सातारकरांनी चौकाचौकात गर्दी केली होती.
शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने सातारा जिह्यातील महाविद्यालयांनी नियोजन केल्याप्रमाणे सातारा शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेचा प्रारंभ जिल्हा परिषदेपासून करण्यात आला. पुढे ही शोभा यात्रा पोवई नाक्यावर पोहचली. सर्वच शोभायात्रेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे दर्शन घेवून अभिवादन केले. पुढे ही शोभायात्रा हॉटेल सायलीमार्गे रयत शिक्षण संस्था, शाहु चौक, कमानी हौद, मोती चौक मार्गे शाहु कला मंदिर येथे पोहचली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या चित्ररथात सैनिकांची महती दिली होती काही चित्ररथात गडकोटांचे महत्व होते. काही चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य साकारण्यात आले होते. ही रथयात्रा शहरातून जात असताना वाहतूक पोलिसांनी वाहतूक वळवली होती.