विनाकारण फिरणायांवर कारवाईचा बडगा
प्रतिनिधी/ सातारा
वाढत्या कोरोना बाधित वाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावलेला असताना देखील विनाकारण बाहेर फिरुन जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी देखील अनेकांना फटके दिले तर 15 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याने पोवईनाका पॉईंटवर बंदोबस्त तैनात केला असून दुपारी विनाकारण फिरणाऱयांना अडवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पोवईनाका परिसरात अशा विनाकारण फिरणाऱया 13 जणांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत.
यामध्ये विनाकारण दुचाकीवरुन फिरणारे अकील अमीर काझी (वय 34, रा. पिरवाडी, सातारा, अभय सुका महाली (वय 53, रा. भोसले कॉलनी, कोडोली), तुनश्री चैतन्य पिसे (वय 27, रा. वाढेफाटा, सातारा), सुयोग राजकुमार वनारसे (वय 48, रा. निशिगंध सोसायटी, एमआयडीसी, सातारा), प्रशांत प्रभाकर सोनमळे (वय 37, रा. पिरवाडी, सातारा), मोहित मगनलाल जैन, वक्ताराम आसाराम देसाई (दोघे, रा. मोळाचा ओढा, सातारा), ओमकार बापूसाहेब कणसे (रा. अंगापूरवंदन, ता. सातारा), विठ्ठल ज्ञानदेव देवगिरी (वय 66 रा. उत्तेकरनगर, पिरवाडी, सातारा, अल्ताफ जमाल शेख (वय 55, अत्तार अल्ताफ शेख (वय 20, दोघे, रा. रविवार पेठ, सातारा), महमंद कलाम अमीर शेख (वय 68, रा. बाँबे रेस्टारंट चौक परिसर, सातारा), राजू गुराप्पा चव्हाण (वय 27, रा. संजीवनी सोसायटी, शाहूनगर, सातारा) यांच्या विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल संभाजी जगताप, किशोर तारळेकर, हवालदार दीपक कांबळे यांनी तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तर पोवईनाक्यावर कार रस्त्यावर लावन ती फुलांनी सजवत असताना सार्वजनिक ठिकाणी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयुब अलताब बागवान (वय 28, रा. सोमवार पेठ, सातारा), भीमराव नामदेव वाघांबरे वय 56, (रा. पिंपोडे बुद्रूक, ता. कोरेगाव) यांच्या विरुध्द हवालदार संजय सपकाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या विरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी. एल. भिसे, पोलीस हवालदार जी. बी. कारळे करत आहेत.
दरम्यान, दिवसभरात कारवाईच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडणे बंद झाल्याने दुपारी रस्त्यांनी थोडा मोकळा श्वास घेतला होता. तर भर उन्हाच्या तडाखा लागत असल्याने नागरिकांनी देखील घरात बसणे पसंत केले. सायंकाळी पुन्हा विविध पॉईंटवर पोलीस बंदोबस्त तैनात झाला आणि वाहनधारकांची तपासणी मोहीम सुरुच होती.