प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर परिसरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठ बोगदा झोपडपट्टी, आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी रेकॉर्डवरील काही आरोपी, गुन्हेगार न मिळून आल्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. यासंदर्भात ’तरुण भारत’ ने झोपडपट्टय़ांमध्ये वाढतेय गुन्हेगारी असे वृत्त टाकून प्रकाशझोत टाकला होता. या कोंबिग ऑपरेशनमुळे गुन्हेगारी कारवाया करणाऱयांमध्ये खळबळ उडाली होती.
सातारा शहर परिसरातील बोगदा परिसरात गेल्या काही दिवसांत दोन खून झाल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मोठय़ा प्रमाणात पेट्रोलिंग आणि बेस्ट पोलिसिंग करण्याबरोबरच रात्रगस्त वाढविणार असल्याचे नमूद केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाहूपुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली हद्दीतील मंगळवार पेठ बोगदा झोपडपट्टी, आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी येथे सोमवारी रात्री अकरा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पोलीस स्टाफसह कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
शाहूपुरी पोलिसांनी या ऑपरेशनमध्ये काही संशयित आरोपींचाही शोध घेतला. त्यामध्ये सूरज उर्फ भैया अशोक चौगूले, मयूर अशोक नलावडे, सूरज वसंत पवार, प्रदीप दीपक पवार (सर्व रा. मंगळवार पेठ, बोगदा परिसर सातारा), अर्जून दौलत पवार (रा. नामदेववाडी, झोपडपट्टी, सातारा), हिस्ट्रीसीटर संतोष शंकर पवार (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) हे रेकॉर्डवरील आरोपी, गुन्हेगार त्यांच्याच दिलेल्या पत्त्यावर आढळून आले. तर लक्ष्मण गोरख पिटेकर, सोन्या उर्फ सुनील कल्याण खवले, अजय गोरख गायकवाड (सर्व रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) हे रेकॉर्डवरील आरोपी मिळून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी आणखी माहिती संकलित करण्याचे काम शाहूपुरी पोलिसांनी हाती घेतले आहे.