प्रतिनिधी/ सातारा
दूध उत्पादक शेतकऱयांना लिटरला पाच रुपये अनुदान द्यावे, 30 हजार लिटर दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, दूध पावडर यासारख्या दुग्धजन्य पदार्थावरचा जीएसटी पूर्णपणे रद्द करावा आदी मागण्यासाठी सातारा जिह्यात भाजपाने पोवई नाक्यावर निदर्शने केली तर रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क दुधानेच आंघोळ केली. जोरदार निषेध नोंदवल्यामुळे साताऱयात दूध आंदोलन चांगलेच तापले आहे. दरम्यान, सरकार दूधाला दर देत नसेल तर सत्तेवर राहुन उपयोग काय असा रोकडा सवाल आमदार शिवेंद्रराजेंनी सरकारवर तोफ डागत केला.
भाजपाच्यावतीने सातारा शहरात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक विकास गोसावी, उपाध्यक्ष किशोर शिंदे, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, विट्ठल बलशेटवार, नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, प्राची शहाणे, ज्ञानेश्वर फरांदे, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, माजी नगरसेवक किशोर पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दूध उत्पादक शेतकरी उपाशी ठाकरे सरकार तुपाशी…. दूध उत्पादक शेतकऱयांना दरवाढ मिळालीच पाहिजे, दूध उत्पादक शेतकऱयांना दुधावर अनुदान मिळाले पाहिजे अशा घोषणा दिल्या.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सध्या दूधासह शेती उत्पादनांना भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्याला न्याय मिळावा, दुधाला दर मिळावा. यासाठी राज्याभर भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज आंदोलन छेडले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आमची एकच मागणी आहे. शेतकऱयांनी कोरोनाच्या परिस्थितीत शहरात व ग्रामीण भागातील लोकांना तारण्याचे काम केले. कोरोनाचे महाभयंकर संकट असताना शेतकरी शांत बसला नाही. विविध अडचणी असूनही शेतकऱयाने रोजच्या रोज दूध, भाजीपाल्याचा पुरवठा केला. अशा शेतकऱयांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारने करावे. सरकार सातत्याने सांगतेय शेतीपुरक व्यवसाय करा. दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. असे असतानाही दूधाला योग्य दर मिळत नसेल तर हे सरकार सत्तेत राहून उपयोग काय, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित करून ते म्हणाले, शासनाने शेतकऱयांच्या या न्याय मागणीला योग्य पध्दतीने न्याय द्यावा. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा दिशा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दूध दर आंदोलनात उपाध्यक्ष अप्पा कोरे, मनीषा पांडे, चंदन घोडके, चिटणीस, रवी आपटे, संतोष प्रभुणे, लक्ष्मण चव्हाण, वैशाली टंकसाळे, माजी शहराध्यक्ष सुनील काळेकर, महिला मोर्च्या अध्यक्षा रीना भणगे, सुनिशा शहा, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, युवती मोर्च्या अध्यक्ष दीपिका झाड, वैद्यकीय आघाडी जिल्हा पदाधिकारी डॉ. उत्कर्ष रेपाळ, अनु जाती मोर्च्या जिल्हा पदाधिकारी शैलेंद्र कांबळे, जेष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शहाणे, युवा मोर्चाचे अमोल कांबळे, किशोर गालफाडे, धीरज घाडगे, व्यापारी आघाडीचे जिल्हा पदाधिकारी डॉ. सचिन साळुंखे, प्रशांत जोशी, औद्योगिक आघाडी अध्यक्ष रोहित साने, कामगार आघाडी अध्यक्ष तानाजी भणगे, अविनाश पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी उपस्थित होते.