प्रतिनिधी/ सातारा
येथील शाहूनगर येथे राहत असलेले व सध्या आंबेजोगाई येथे न्यायाधीश असलेले चंद्र मोहन खारकर यांचे मोठे बंधू ऍड. राम मोहन खारकर (वय 37) यांच्यावर शाहूनगर चौकात शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा जणांनी गाडी अडवून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऍड. राम मोहन खारकर हे कार (क्रं. एम.एच 11 डीके. 0016) मधून शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास मोनार्क हॉटेल रोडवरून शाहूनगरकडे जात होते. यावेळी रोडच्या चढाला 5 ते 6 अनोळखी इसम हे रोडवर उभे होते. ऍड. खारकर हे त्यांना रस्त्यावरून बाजूला थांबा असे म्हणल्याने त्यांनी त्यावर नकार दिला आणि त्यांच्या अंगावर आले. यामुळे ऍड. खारकर हे कार घेऊन पुढे गेले असता गाडीच्या पाठीमागून दोन मोटार सायकली आल्या व त्यांच्या कारला आडव्या लावून कारमध्ये ऍड. खारकर बसलेल्या बाजूस येऊन कारच्या काचेवर रॉडने मारून नुकसान केले. रॉडने त्यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला असता हे इसम त्याठिकाणहून पळून गेले. या मारहाणीत त्यांच्या उजव्या डोळ्यास दुखापत झाली आहे.
सीसीटीव्हीत मारहाणीची घटना कैद
ऍड. खारकर यांच्यावर खुनी हल्ला कोणी व कोणत्या करणांसाठी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जिथं हा हल्ला झाला तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सातारा शहर पोलिसांनी सुरू केले असून, लवकरच हल्लेखोर हाती लागतील असे पोलिसांनी सांगितले.