शाहूनगरमध्ये घरफोडी – 10 हजारांचा टीव्ही चोरला
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरटय़ांनी बंद घरांना टार्गेट केले आहे. बंद घर दिसले चोरटे त्यावर डल्ला मारत असून दोन दिवसांपूर्वी केसरकर पेठेतील बंद बंगला फोडून चोरटय़ांनी 10 लाखांचे दागिने लंपास केले. तर शाहूपुरी चौकातील दोन बंद दुकानेही फोडून हजारो रुपयांचा माल लंपास केला असतानाच 5 रोजी शाहूनगरमध्ये बंद घर फोडून चोरटयांनी 10 हजारांचा लिड टीव्ही चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. तक्रारदार मयुरा सुनील महाजन (वय 46) या सध्या पुण्यात रहात आहेत. त्यांचा साताऱयातील शाहूनगरमधील श्रीधर स्वामी सोसायटीतील बंगला बंदच असतो. दि. 5 व 6 रोजी दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराच्या लाकडी दरवाजाचे कुलूप, कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
मात्र, सुदैवाने घरात इतर मौल्यवान चीजवस्तू ठेवल्या नव्हत्या. त्यामुळे चोरटय़ांनी मग 32 इंची एल. जी. कंपनीचा टीव्ही चोरुन नेला. ही बाब महाजन यांना समजल्यावर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या चोरीचा अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.