न्यू इंग्लिश चौकातील घटना : केक कापला अन फटाके फोडले
प्रतिनिधी / सातारा
साताऱयातील सोमवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल चौकात सार्वजनिक ठिकाणी भर दिवसा 12 वाजता संचारबंदी आदेशाचा भंग करत दुचाकीवर केक कापून फटाके फोडणाऱया बर्थ डे बॉससह दहा मुलांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी शाहूपुरी पोलिसांना सोमवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल चौकात काही मुले भर रस्त्यात जमाव जमवून वाढदिवस साजरा करुन गोंधळ करत असल्याचा फोन आला. त्याठिकाणी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गेल्यानंतर तिथे काही मुले सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवुन वाढदिवस साजरा करत होते.
पोलीस गाडी आल्याचे पाहून तेथे जमलेली मुले पळून गेली. तिथे चौकशी केली असता बर्थ डे बॉय मंगेश मधुकर देवकर (वय 18, रा. गुरुवार पेठ सातारा) याचा वाढदिवस असून त्याच्यासोबत बर्थडे साजरे करणारे गुंडया कांबळे (वय 19, रा. प्रतापसिंहनगर सातारा), अजिंक्य देशमुख (रा. गोडोली) व इतर पाच ते सहा मुले असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हया संचारबंदी आदेश असताना या आदेशाचे उल्लंघन करुन या मुलांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमाव जमाव जमवून वाढदिवस साजरा केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांनी दिली. त्यानंतर बर्थ बॉयसह दहा मुलांवर गुन्हो दाखल करण्यात आला आहे.