पोलीसवाले ‘दादा’ लक्ष घाला जरा, जुजबी कारवाया नकोत
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा लॉकडाऊन सैल झाला अन् सातारा शहराला मटक्याचा विळखा घट बसला. कमी कष्टात जास्त पैसा मिळवण्याच्या नादात अनेकांची घरे उध्वस्त होत आहेत. त्यामध्येच सातारा शहरात काही ठिकाणी हायफाय मटका सुरु आहे. पोलीस दादा या मटक्यांचे अड्डय़ावर वरवरची कारवाई नको तर पूर्णपणे बुक्कींचे दुकानच बंद करण्यात यावे, अशी मागणी साताराशहरवासियांमधून होवू लागली आहे.
सातारा शहरात मटक्याचे अड्डे हे ठिकठिकाणी पहायला मिळतात. त्यामध्ये मग राजवाडा येथील कस्तुरबा रुग्णालयाच्यासमोरच असणाऱया पानटपरीत मटक्याची पावती घेतली जाते. चाँदणी चौकात चालता चालता मटका काहीजण घेतात, तर मंगळवार तळे रोडवर एकच मटक्याच्या पावत्या फाडतो. गांधी मैदानाच्या कोपऱयात एकजण मटका घेतो. जुना मोटरस्टॅण्ड येथील एका टपरीवर मटका खेळला जातो. गुरुवार परजावरही एका बोळात मटक्याच्या पावत्या फाटतात. सातारा बसस्थानक परिसरात, जिल्हा परिषद चौक, पोवई नाका येथील कासट मार्केटच्या परिसरात, विसावा नाका, बॉम्बे रेस्टाँरट येथील एका हॉटेलच्या मागे आदी ठिकाणी मटका जोरात सुरु आहे. या सुरु असलेल्या मटक्यांकडे सातारा पोलिसांचे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे मटका बुंकींवर कारवाई करायला पोलीस गेल्यानंतर मटक्याची पावती फाडायला जे दलाल बसलेले असतात त्यांच्यावर जुजबी कारवाई होत असते. परंतु ज्यांच्याकडून हे काम सुरु आहे त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा शहरातून होत आहे.
मटक्याला ब्रेक कसा लावणार?
मटका बुकी बाहेरुनच मोबाईलवरुन संदेश देत असतो परंतु जो टपरीवर असतो तोच मटक्याचे सगळे व्यवसाय पहात असतो. पोलिसांनी टपरीवर मटका पाहातो त्याच्यासह जो मुख्य आहे त्याच्यावरही कारवाई करुन ब्रेक लाववा, अशी मागणी होवू लागली आहे.
मोळाच्या ओढय़ाच्या परिसरातही फोफावला मटका
बुधवार नाका ते मोळाचा ओढा या दरम्यानही मटक्याचे नवनवीन अड्डे तयार झालेले आहेत. या व्यवसायात नवीन मटका चालक दिसू लागले आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. मटक्याचे जाळे शहरात विनले आहे. ते जाळे पोलिसांनी मोडून काढावे, अशी मागणी होवू लागली आहे.
पोलीसवाले ‘दादा’ लक्ष घाला जरा, जुजबी कारवाया नकोत