प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील अवैध मटका व्यवसायावर शुक्रवारी सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली धडक करण्यात आली. या कारवाईत सुमारे साडे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी 57 जणांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. संशयितांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सातारा शहरातील अवैध जुगार व मटका व्यवसायात वारंवार कारवाई करुन देखील ते बंद होत नाहीत. मात्र, पोलिसांनी सातत्याने कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले असून शुक्रवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केलेल्या मोठय़ा कारवाईत सातारा शहरात विविध मटका अड्डय़ांवर छापे टाकले. या कारवाईमुळे सातारा बसस्थानक परिसर, मोळाचा ओढा, समर्थ मंदिर, खारी विहीर, मंगळवार पेठ येथे मोठी खळबळ उडाली होती.
सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सायंकाळी पाच ते सात वाजताच्या दरम्यान विविध ठिकाणी विविध मटका अड्डय़ांवर छापे टाकून एकूण 57 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मटका जुगार व रोख रक्कम असा एकूण साडेआठ लाख रुपयाचा माल हस्तगत केलेला असल्याची प्राथमिक माहिती असून संशयितांना शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. संशयितांची संख्या मोठी असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, अमोल बागल, प्रशांत शिंदे उज्वल कदम, बालम मुल्ला, दादासो बनकर, मंगेश डोंबे तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डीबीचे हसन तडवी, हिंमत दबडे पाटील, लैलेश फडतरे, मोहन पवार, अमित माने, पकंज मोहिते आदींनी सहभागी घेतला होता.