प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाची भिती दिवसेंदिवस वाढत आहे, त्याला केवळ हात स्वच्छ करण्याने रोखू शकतो का? हा प्रश्नच आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणून येथील माऊली टेस्ट टय़ूब बेबी सेंटरचे डॉ. आर. एस. काटकर यांनी अमित वग्नराडकर, परेश अदवाणी यांच्या मदतीने सॅनिटायझर शॉवर ही अफलातून संकल्पना साकारली आहे. साताऱयातील गर्दीची ठिकाणे बसस्थानक तसेच शासकीय कार्यालये, दवाखाने, मंडई, बँकांनी ही संकल्पना अंमलात आणल्यास कोरोनाला रोखण्यासाठी आपण आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलू शकतो.
कोरोना व्हायरसचे जगाला हादरुन सोडणारे संकट आपल्या सर्वांसमोर आ वासून उभे आहे. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी घरीच राहणे हा सर्वात मोठा उपाय सांगितला जात आहे. त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. परंतु, हे करताना अत्यावश्यक सेवा, काही शासकीय कार्यालये, बँका, रुग्णालये, भाजीपाल्याची मंडई सुरु ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या लोकांसाठी मास्क वापरणे, हॅण्डग्लोज घालणे, हात सॅनिटायझरने निर्जंतुक करणे सातत्याने शक्य होत नाही. शिवाय, कोरोनाचा विषाणू कापडांवर, डोक्यावर किंवा शरीराच्या अन्य भागावर राहू शकतो. अशा प्रसंगी संपूर्ण बाह्य शरीराचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव आपणाला पूर्ण ताकदीनिशी रोखता येत नाही.
यावर पर्याय म्हणून येथील डॉ. काटकर यांनी अमित वऱहाडकर, परेश अदवाणी यांच्या मदतीने सॅनिटायझर शॉवरची निर्मिती केली आहे. रेन डान्स थीमच्या धर्तीवर हे स्प्रिंकलर बसविले असून, त्या शॉवरमधून जातात साबणाचे पाण्याद्वारे अथवा सॅनिटायझरद्वारे संपूर्ण बाह्य शरीराचे निर्जंतुकीकरण होत आहे. त्यामुळे शरीरावरील कापडे, डोके, बाह्यअंग निर्जंतूक होत असते. या उपायामुळे कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.
तुर्कस्थान यासह अनेक देशांमध्ये अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर शॉवर उभारले गेले आहेत. भारतातही शासन, प्रशासन त्यादृष्टीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. प्रशासकीय कार्यालये, मोठे हॉस्पिटल, शासकीय रुग्णालयांनी हा पर्याय वापरणे गरजेचे ठरणारे आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी भाजी मंडईत येणाऱया-जाणाऱया लोकांसाठीही हा पर्याय उपलब्ध करणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
साताऱयात निर्मिती होणार
रेन डान्स थीमच्या धर्तीवर हे स्प्रिंकलर बसविले असून, त्या शॉवरमधून जातात साबणाचे पाण्याद्वारे अथवा सॅनिटायझरद्वारे संपूर्ण बाह्य शरीराचे निर्जंतुकीकरण होत आहे. याची किंमत साधारण 18 ते 30 हजार रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये सोलर पॉवरवर चालणाऱया शॉवरपासून ऑटोमॅटिक चालणारा शॉवर तसेच एखाद्या व्यक्तीकडून चालवण्यात येणाऱया शॉवर अशा मॉडेल्सचा समावेश आहे. हा सॅनिटायझर शॉवर कोठे वापरायचा आहे व किती लोकांसाठी हवा आहे त्या त्या गरजेनुसार त्याची निर्मिती करणार आहेत. अधिक माहितीसाठी परेश अदवाणी यांच्याशी मोबाईल क्रमांक 9890852663 अथवा adonitech@gmail.com वर संपर्क साधावा.