मटका, जुगार, अवैध दारु- झोपडपट्टय़ांसह शहरात अवैध व्यवसायांना पेव
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सातारा शहर तसे शांत. निवृत्तांचे शहर अशा अनेक उमपा सातारा शहराला दिल्या जातात. मात्र, याच सातारा शहर व परिसरात भर रस्त्यात कोयता हल्ला, तलवार हल्ले होत आहेतच. मात्र, मटका, जुगार, अवैध दारुसह खासगी सावकारी, जातीवाचक शिवीगाळीसह, जबरी चोरी, घरफोडय़ा, दुचाकी चोऱयांच्या अनलॉक प्रक्रियेनंतर वाढतच चाललेल्या आहेत. सर्वसामान्यच नव्हे तर कोणत्याही नागरिकांना निर्भयपणे जगायचे असेल तर पोलीस दलाला ही गुन्हेगारी मोडून काढावीच लागेल.
मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मे, जूनपर्यंत लॉकडाऊन कालावधीत साथरोग नियत्रंण कायद्यान्वये दाखल होणारे नियम उल्लंघनांचे गुन्हे सोडल्यास क्राईम रेट शुन्य झाला होता. कोरोनाच्या भीतीमुळे सर्व नागरिक घरातच असल्याने या काळात अगदी विषप्राशन, आत्महत्या, भांडणे, खून, मारामाऱयाची अपवाद सोडल्यास एकही घटना घडली नाही. कोरोनाच्या संकटकाळात माणुसकीने जगण्याचे भान माणसांना आले अशी चर्चा करत सर्वजणच एकमेकांची पाठ थोपटून घेत होतो.
मात्र जूननंतर अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हळूहळू जगरहाटी सुरु झाली. तरीही क्राईम कमीच होता. पावसाळा सुरु झाल्याने आणि त्यातच कोरोनाने कहर केल्याने ऑगस्ट, सप्टेंबर महिने जिल्हावासियांनी भीतीच्या छायेखाली काढले. तेव्हा सर्वांच्या मनात माणुसकी जिवंत होती की जगण्याचीच भीती असल्याने मनातील राक्षस मेले होते अशीच स्थिती सर्वजण अनुभवत होते. कोरोनाचा कहर थोडा कमी होवू लागल्यावर ऍनलॉकचे टप्पे पुढे जाताने शासनाने दारुची दुकाने सुरु केली.
दारु दुकाने सुरु झाल्यानंतर क्राईम रेट पुन्हा वाढू लागला असा सार्वजनिक अनुभव आहे. मटका खुलेपणे सुरु झाला. लॉकडाऊन कालावधीत नुसते बसून काय करायचे म्हणून काही लोक पैशावर जुगार खेळत होते. आजमितीस जेवढा दारुचा काळाबाजार सुरु नसेल तेवढा प्रचंड काळाबाजार संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात झालेला आहे. दारुचे भक्त असलेल्यांनी दारुच्या नशेसाठी हजारो रुपयांची देखील पर्वा केलेली नव्हती.
तीच दारु शासनाने सुरु केल्यावर अगदी मंदिर सुरु झाल्यागत रांगा लावून लोकांनी दारुही विकत घेतली. अनलॉक प्रक्रियेतील अनेक निर्बंध खुले झाल्यावर मग ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या काळात कोरोनाचा कहर कमी होवू लागला. कोरोनाची भीतीही कमी होवू लागली होती. तेव्हा माणुसकीचा गजर कमी झाला आणि गुन्हेगारी घटना वाढू लागल्या. अपघातांचे प्रमाण वाढले. विषप्राशनाच्या लॉकडाऊन काळात बंद झालेल्या घटना देखील वाढल्या.
सातारा शहरात दारु झाल्यानंतर एका मित्राने दारुसाठी पैसे न दिल्याने दारुच्या नशेत एका मित्राचा खून केल्याची घटना घडली. तेव्हापासून मग खिंडवाडी परिसरात खुनाची घटना, बोगदा परिसरात खुनाची घटना, म्हसवे परिसरात मुलाचा खून, कृष्णानगर परिसरात महिलेचा खून, भुईंजला खून करुन रीतसर अंत्यसंस्कार उरकणाऱया प्रवत्ती, खटाव तालुक्यात जमीन विक्रीतून आलेल्या पैशांसाठी बापाचा खून करणारा मुलगा अशा अनेक घटनांनी समाजमन ढवळून निघाले आहे.
कारावाया होतातच पण गुन्हेगारी वाढली
सातारा शहराचा वाढता व्याप पाहून दोन स्वतंत्र पोलीस ठाणी सुरु झाली. मात्र, त्यांच्याकडील मनुष्यबळ पूर्वी होते तेवढेच आहे. पोलीस दलाने खुनाचे तपासही तातडीने लावलेत, मटका, जुगार, अवैध दारुवर कारवाया सुरुच आहेत. मात्र, गुन्हेगारी थांबत नाही. वाढेफाटा राष्ट्रीय महामार्ग गुन्हेगारीसाठी संवेदनशील झालाय, तर सातारा बसस्थानक, मार्केटयार्ड परिसरही संवेदनशील आहे. जबरी चोरी, घरफोडय़ा, मोबाईल, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यात. माणसांचे जगणे सुरक्षित करण्यासाठी कायदा राबवण्याची गरज निर्माण झालीय.
गुन्हेगारी टोळय़ांना मोक्का पण..
पोलीस दलाकडून गुन्हा घडला की त्याचा तपास आणि पुढील कारवाई होतच असते. मात्र, गुन्हे घडूच नयेत यासाठी समाज, प्रशासनाकडून उपाय योजना होत नाहीत. गुन्हेगारी विश्वात तरुणाईचा वाढता सहभाग अनेक कुटुंबांचे भावविश्व उध्दवस्त करत आहे. सातारा शहर व तालुक्यात गुन्हे करणारी एक टोळी वर्षभरासाठी तडीपार करण्यात आलीय. त्यातील विशीतील गुन्हेगार समाजाला भय घालतात ही सातारची संस्कृती निश्चितपणे नाही. यात फक्त पोलीस दलावर जबाबदारी टाकून मोकळे होता येणार नाही तर समाज, कुटुंबांतील संस्कृती सुधारण्याचीही गरज आहे.
मटकाकिंग मोकाटच का फिरतात
सातारा शहरात वर्षानुवर्षे मटका चालवणाऱया अड्डय़ांचे मालक कोण आहेत हे नागरिकांसह पोलिसांना ठावूक आहे. सातत्याने छापे टाकले अड्डामालकांसह त्यांच्या पंटराची नावे कारवाई येतात. मात्र, मटका परत सुरुच असतो. पंटर बदलतात मात्र मटका अड्डय़ांचे मालक तेच असतात. हे दृष्टचक्र थांबवण्यासाठी मटका चालवणाऱयांना मोक्का लावण्याची गरज आहे. सातत्याने कारवाया होवून देखील मटका चालवला म्हणून कठोर शिक्षा नसल्याने आणि यामध्ये काहींचे हात ओले होत असल्याने मटकाकिंग मोकाटच आहेत.