जिवीतहानी नाही; बुधवारी रात्रीची घटना
प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या बंगला परिसरात आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने तात्काळ अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्याने जिवीतहानी टळली. अज्ञात व्यक्तीने शेकोटी पेटविल्याने अथवा सिगारेट टाकल्यामुळे या ठिकाणी आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित शासकीय बंगला आहे. बंगला परिसरात मोठय़ा प्रमाणावर गवत व झाडे आहेत. बुधवारी सायंकाळी उशिरा बंगल्याच्या कपाऊंडच्या आत अचानक आग लागली. गवतामुळे ही आग क्षणार्धात परिसरात पसरली.
या घटनेची माहिती बांधकाम विभागाचे कर्मचारी संजय तवले यांना कळताच त्यांनी अग्निशामक दलाला माहिती देवून बांधकाम विभागाच्या कर्मचाऱयांसमवेत ते घटनास्थळी दाखल झाले. सातारा नगरपालिकेचे अग्निशामक दल आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱयांनी ही आग विझवली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.