रोख पैशांसह सोन्याचे दागिने लंपास
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात घरफोडय़ांचे सत्र वाढले असून शहरासह उपनगरातील घरांना चोरटय़ांनी टार्गेट केले आहे. दि. 5 भरदिवसा गोडोलीतील एका बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरटय़ाने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 यातील तक्रारदार संदीप रामचंद्र कदम (वय 41, रा. 652, अ, गोडोली, शिवदर्शन सोसायटी, विलासपूर, गोडोली, सातारा) हे घराला कुलूप लावून गेले होते. त्यावेळी दिवसभरात अज्ञात चोरटय़ाने मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला.
चोरटय़ाने 5 हजार रुपये किंमतीची सोन्याची ठुशी, 5 हजारांचे कानातील टॉप्स, 18 हजारांच्या लहान बाळाच्या अंगठय़ा, मुद्या, 5 हजारांचे पैंजण, करगुटे, जोडवी, चांदीची मूर्ती आणि रोख रक्कम 40 हजार असा एकूण 73 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार जाधव या चोरीचा अधिक तपास करत आहेत.