सातारा / प्रतिनिधी :
भारतीय शौर्य पुरस्कार सुधारित संकेतस्थळाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 25 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या सोहळय़ात विविध गुणदर्शन सादर करण्याचा बहुमान साताऱ्याच्या सैनिक स्कूलला मिळाला आहे. सातारा जिल्ह्यासाठी हा अभिमान आहे. सातारची सैनिक स्कूलची शाळा ही देशातील पहिली सैनिकी शाळा आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्करातील शूरवीरांना नमन करित दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कार संबंधित संकेतस्थळाच्या नूतन आवृत्तीचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय लष्करामध्ये आपल्या त्याग आणि बलिदान याने ठसा उमटविणाऱ्या थोर सैनिकांना दिल्या गेलेल्या आणि दिल्या जाणाऱ्या विविध शौर्य पुरस्कारांची आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांची माहिती संकलित करण्याचे बहुमूल्य कार्य या संकेतस्थळाद्वारे केले जात आहे. या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण विविध प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमे यांच्याद्वारे केले जाणार आहे.