प्रतिनिधी / सातारा :
नाना पटोलेंचे वक्तव्य…दारुडय़ा गावगुंडासारखे, गांजाड्या नानांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आक्रमक होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत नाना पटोलेच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केले असून ते एका दारुडय़ा गावगुंडासारखे बोलत आहेत, पटोले यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन केले.
भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी म्हणाले,नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुडय़ा गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे. आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ते याचा निषेध करतो. मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरडय़ा टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर ‘तो मी नव्हेच’ असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा त्यांनी दिला.
पोलीस प्रशासनाकडे नाना पटोले यांची तक्रार करूनही अजूनही एफआयआर दाखल झाली नाही. पोलीस प्रशासनाने कोणाचाही बंधनात न राहता काम करावे आणि एफआयआर दाखल करावी. नाना पटोले यांनी दारुडय़ा सारखे जे वक्तव्य केले त्यामध्ये त्यांनी महिलांचाही अपमान केला आहे. महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जर राष्ट्राबद्दल प्रेम असेल, पंतप्रधान पदाबद्दल त्यांच्याबद्दल त्याच्या मनात किंमत असेल तर त्यांनी नाना पटोले यांना ताबडतोब अटक करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नानांना त्यांची जागा दाखवतील आणि होणाऱ्या परिणामास महाविकास आघाडी जबाबदार असेल असे त्यांनी स्पष्ट केले.